वाजत-गाजत बाप्पांचे आगमन

Friday, 25 August 2017

पुणे: 'मोरया-मोरया'चा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष... जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्या 'अँगल'ने हे सगळं कसं टिपून घेण्याच्या प्रयत्नांत असणारे अनेकानेक कॅमेरे आणि स्मार्टफोन्स... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून असणारा प्रत्येकजण... आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शहरात बाप्पांच्या मिरवणुकांना आज (शुक्रवार) सुरवात झाली.

पुणे: 'मोरया-मोरया'चा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष... जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्या 'अँगल'ने हे सगळं कसं टिपून घेण्याच्या प्रयत्नांत असणारे अनेकानेक कॅमेरे आणि स्मार्टफोन्स... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून असणारा प्रत्येकजण... आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शहरात बाप्पांच्या मिरवणुकांना आज (शुक्रवार) सुरवात झाली.

'सरीवर सरी आल्या गं...' म्हणत आज सकाळपासूनच पावसाने आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं. थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या या सरी वातावरणात एक आगळाच सुखद गारवा निर्माण करत होत्या. अशातच दुसऱ्या बाजूला बाप्पांच्या आगमनासाठी देखील अवघे भाविकजन जणू तयार बसले होते. एकीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू होती, तर दुसरीकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आगमन होऊ घातलं होतं. तिकडे मंडई च्या दिशेने एव्हाना बाबू गेनू आणि अखिल मंडई मंडळाच्या बाप्पांच्या आगमनाचे वेध ही लागू लागले होते. अशा चित्तवेधक वातावरणात सकाळी साडेआठच्या सुमारास मिरवणुका सुरू झाल्या...

पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरवणुका काहीशा उशिरा सुरू झाल्या. भाविकांची संख्याही सुरवातीला कमी जाणवत होती. मात्र, कुणाच्याही उत्साहात तीळमात्र कमतरता दिसत नव्हती. किंबहुना तो क्षणोक्षणी वाढतच असल्याचं दिसलं. ओंकार स्वरूपा, गजानना श्री गणराया या कानांवर पडणाऱ्या धून वातावरणाला नवा साज चढवत होत्या.

या पार्श्वभूमीवर अश्वांच्या प्रतिमांनी आणि असंख्य फुलांनी सजलेला असा दगडूशेठ हलवाई गणपती चा मिरवणूक रथ आणि त्यात विराजमान असणारे बाप्पा पाहताना अनेक भाविक हरखून गेल्याचं दिसून येत होतं. ढोलताशा पथकांसह बँड पथकांनी केलेलं दिमाखदार वादन या वेळी उपस्थितांची दाद मिळवून गेलं. आरतीनंतर बाप्पांची मूर्ती मंदिरातून रथात आणताना 'मोरया मोरया'चा एकच जल्लोष ऐकू येत होता.

दगडूशेठ नंतर तब्बल सव्वा तासाने भाऊ रंगारी गणपतीचं बुधवार चौकात आगमन झालं, त्यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल पाच ढोलताशा पथकांच्या दिमाखदार वादनाच्या पाठोपाठ भाऊ रंगारी गणपतीचा मिरवणूक रथ आला. या वेळी तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिकं ही सादर करण्यात आली.

अखिल मंडई मंडळाची श्री शारदा गजाननाची देखणी मूर्ती ज्यावेळी मिरवणूक मार्गाने मार्गस्थ झाली, त्यावेळी पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी पुनरागमन केलं. या वेळी मिरवणूक आणि वाद्यवादन मात्र उत्साहात सुरूच होतं. बाप्पांची मूर्ती पावसात भिजू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यावर प्लास्टिकचं आवरण धरून ठेवलं होतं. रथावर सजवलेली फुलांची महिरप या वेळी मोठी शोभून दिसत होती. यासोबतच, बाबू गेनू आणि जिलब्या गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाल्याचं पाहायला मिळालं. ढोलताशा पथकांनी वाजवलेले निरनिराळे ताल आणि त्यावर सादर विविध रचना यामुळे मिरवणुकीत वेगळाच रंग भरला होता. बाप्पांची प्रतिष्ठापना होईपर्यंत भाविक थांबून होते.