मानाच्या बाप्पासह देखावे पाहण्यास पसंती

सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नारायण पेठ

पुणे - नारायण पेठेतील गणेश मंडळांनी यंदा धार्मिक, पौराणिकसह ऐतिहासिक विषयांना प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी मात्र काल्पनिक फुलांची; पण साध्या पद्धतीने सजावट केली आहे. पहिल्या दिवसापासून या पेठेतील मंडळांचे देखावे भाविकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत. 

नारायण पेठ

पुणे - नारायण पेठेतील गणेश मंडळांनी यंदा धार्मिक, पौराणिकसह ऐतिहासिक विषयांना प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी मात्र काल्पनिक फुलांची; पण साध्या पद्धतीने सजावट केली आहे. पहिल्या दिवसापासून या पेठेतील मंडळांचे देखावे भाविकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत. 

नारायण पेठेत असलेल्या मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची आवर्जून उपस्थिती दिसली. केसरी-मराठा ट्रस्टतर्फे येथे उत्सव काळात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांनी गाड्यावरच देखावे उभे करून त्यावरच श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतही हेच देखावे भाविकांना पाहायला मिळतील. काष्टाचा बोळातील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने बांबूच्या वस्तूंपासून श्रींची मूर्ती साकारली आहे. पत्र्या मारुती मंडळाने काल्पनिक मंदिर उभे केले आहे. वीराची तालीम मंडळाने साध्या पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. मुठेश्‍वर मित्र मंडळाने गाड्यावरच आरास करून त्यावरच श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गरूड गणपती मंडळ, विनायक मित्र मंडळाने जिवंत देखावा साकारला आहे, तर गजानन मंडळाने थर्माकोलच्या काल्पनिक मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना केली असून, समोर कारंजेही उभारले आहे. भोलेनाथ मित्र मंडळाने शककर्ते शिवराय हा देखावा केला आहे. 

आवर्जून पाहावे असे... 
केसरीवाड्याचा गणपती
भोलेनाथ मित्र मंडळ
माती गणपती मंडळ  
गरुड गणपती मंडळ
गजानन मंडळ
नातूवाडा मित्र मंडळ
शनिवार वीर मारुती मंडळ
मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळ

शनिवार पेठ - ऐतिहासिक देखाव्यांसह वैज्ञानिक देखावे 
सामाजिक आणि ऐतिहासिक देखाव्यांसह वैज्ञानिक देखावे सादर करण्याची परंपरा शनिवार पेठेतील मंडळांनी जपली आहे. यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्ताने उत्साही वातावरणात मंडळांनी श्रींच्या मूर्तींसमोर देखाव्यांचे सादरीकरण केले आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून मंडळांचे देखावे पाहायला नागरिक आवर्जून उपस्थिती दर्शवू लागले आहेत. 

शनिवार पेठेत अनेक वर्षांपासून धार्मिक पद्धतीने पण शांततेत उत्सवाची परंपरा बहुतांश मंडळांनी आजही कायम ठेवली आहे. हसबनीस बखळ येथील गणेश मंडळासहित नातूवाडा मित्र मंडळ, कडबे आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ मेहूणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जयहिंद मित्र मंडळांचे देखावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लोखंडे तालमीने यंदा साध्या पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे.

विद्युत रोषणाईच्या देखाव्यांची परंपरा कडबे आळी तालीमीने यंदाही राखली आहे. हिंदी-मराठी गाण्यांवरचा रोषणाईचा देखावा मंडळाने केला आहे. शनिवार वीर मारुती मंडळ या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सादर करत आहे. या निमित्ताने बालाजी मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभी केली आहे. नातूवाडा मित्र मंडळाने नवी मुंबई, पनवेलजवळील प्रस्तावित विमानतळाची प्रतिकृती उभारली आहे. अनेक वर्षे नातूवाड्यातर्फे वैज्ञानिक देखाव्यांतून सद्यपरिस्थितीची माहिती उत्सवात देण्यात येते.