सामाजिक, पौराणिक आणि जिवंत देखाव्यांवर भर

Tuesday, 29 August 2017

पुण्याचा पूर्व भाग
पुणे - ऐन पावसाळ्यात बाप्पांचे आगमन झाले असले, तरीही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता झाल्याचे दिसत नसल्याचे चित्र पुण्यातील पूर्व भागांत पाहायला मिळत आहे. नव्याने वसलेल्या उपनगरांच्या तुलनेत जुना असलेल्या पूर्व भागात पेठांमधील अनेक जुनी मंडळं आहेत. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सामाजिक आणि पौराणिक विषयांवरील भव्य आकारांच्या देखाव्यांप्रमाणेच काही जिवंत देखावे ही या भागाचे वैशिष्ट्य ठरत आहे...  

पुण्याचा पूर्व भाग
पुणे - ऐन पावसाळ्यात बाप्पांचे आगमन झाले असले, तरीही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता झाल्याचे दिसत नसल्याचे चित्र पुण्यातील पूर्व भागांत पाहायला मिळत आहे. नव्याने वसलेल्या उपनगरांच्या तुलनेत जुना असलेल्या पूर्व भागात पेठांमधील अनेक जुनी मंडळं आहेत. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सामाजिक आणि पौराणिक विषयांवरील भव्य आकारांच्या देखाव्यांप्रमाणेच काही जिवंत देखावे ही या भागाचे वैशिष्ट्य ठरत आहे...  

शुक्रवार पेठ -
जय हनुमान मित्रमंडळाने (खडकमाळ आळी) उभा केलेला ‘कुंभकर्णाची निद्राभंग’ हा देखावा येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. विशेषतः लहानग्यांना हा देखावा अधिक आवडत असल्याचे दिसून आले. आधी सतत झोपून असणारा पंधरा फूट उंच कुंभकर्ण हळूहळू उभा राहताना पाहणे रोचक ठरत आहे.
खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले ९४ वे वर्ष साजरे करत आहे. ‘लेझर शो’ आणि लाईटिंगच्या तालावर नाचणारे कारंजे असा रोषणाईचा देखावा यांनी सादर केला आहे. या लेझर शो मधून स्त्रीभ्रूण हत्या, पाणी वाचवा, राष्ट्रीय एकात्मता असे संदेश देण्यात येत आहेत.

गंज पेठ -
सामाजिक समरसतेची हाक जिथून दिली गेली, अशा महात्मा फुले वाड्याजवळ असणारे जय जवान (समता) मित्रमंडळ गेली काही वर्षे सातत्याने सामाजिक विषयांवरील देखाव्यांसाठी ओळखले जाते. यंदाही त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख करून जाणाऱ्या वृद्धाश्रमाच्या विषयावरील ‘म्हातारपण- एक समस्या’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. भाविक मोठी गर्दी करत हा देखावा पाहताना दिसून आले. वाढत्या शहरांना असणारा वाढत्या वृद्धाश्रमांचा ‘शाप’ यातून ताकदीच्या कलाकारांच्या अभिनयामुळे परिणामकारकतेने उभा केल्याचे दिसून आले. हा देखावा पाहताना अनेकदा प्रेक्षकांच्या डोळ्यांतून पाणी आल्याचेही दिसून आले.

मंगल क्‍लब मित्रमंडळाने महादेवाचे तांडव नृत्य हे आपल्या भव्य आकाराच्या देखाव्यातून भाविकांपुढे यंदा आणले आहे. २० फूट उंचीचे महादेव आणि सोबतीनी कार्तिकेय स्वामी, पार्वती देवी, महादेवांचा आवडता नंदी असे सारे या देखाव्यात उभारण्यात आले आहेत. यासोबतच या हलत्या देखाव्यात गंगावताराची कहाणीही दाखवण्यात आली आहे.

रविवार पेठ -
कस्तुरे चौक तरुण मंडळ यंदा आपले ९८ वे वर्ष साजरे करत आहे. आपल्या शताब्दीकडे वाटचाल सुरू असणाऱ्या या मंडळाने गेली अनेक वर्षांची असणारी आपली विद्युत रोषणाईच्या देखाव्यांची परंपरा खंडित करून वेगळ्या पद्धतीचा देखावा सादर केला आहे. यंदा या मंडळाने देशभक्तिपर देखावा उभारला असून, देशासाठी ज्यांनी योगदान दिले अशा मान्यवरांच्या गौरवार्थ ‘राष्ट्रगौरव रथ’ उभारला आहे. यात ‘वंदे मातरम’ गीताचे उद्गाते बंकीमचंद्र चॅटर्जी, राष्ट्रगीताचे उद्गाते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि भारतीय तिरंग्याचे प्रणेते पिंगली वेंकय्या यांचे उभारलेले देखणे पुतळेही पाहायला मिळत आहेत. शिवाय, आपल्या तिरंगी झेंड्याचा प्रवास कसा झाला, हेही या देखाव्यात पाहायला मिळेल.

राजगुरू तरुण मंडळाने यंदा राममंदिराचा देखणा देखावा सादर केला आहे. हा गणपती ‘सत्याग्रही गणपती’ म्हणूनही ओळखला जातो. मंदिराच्या रचनेसोबतच प्रभू श्रीरामांची १२ फूट उंच प्रतिमा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री सुंदर गणपती तरुण मंडळ ट्रस्टने ‘स्वच्छतेचा श्रीगणेशा’ हा स्वच्छ भारत अभियानावरचा जिवंत देखावा सादर केला आहे. कचऱ्यामुळे होणारे नद्यांचे प्रदूषण, आपल्या आसपास सुरू असणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक गोष्टींवर यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

घोरपडे पेठ -
बालवीर मित्रमंडळाने खंडोबा रायाकडून (जय मल्हार) मनी मल्लाचा करण्यात आलेला वध हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. सुमारे २२ फूट उंच असा बोलका जय मल्हार आणि सोबतीला असणारे इतर हलते पुतळे आणि पार्श्‍वसंगीत, यामुळे हा देखावा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाची विसर्जन मिरवणूक न करता त्याचा खर्च अनाथाश्रमासाठी देणार असल्याचे या मंडळाने ठरवले आहे.
जवान मित्रमंडळाने चक्क सर्कसच आपल्या बाप्पांच्या शेजारी उभी केली आहे. सर्कशीच्या या देखण्या हलत्या देखाव्यात दोन जोकर, एक घोडा, दोन हत्ती आणि एक सिंहही पाहायला मिळत आहेत. हा देखावाही अनेक लहानग्यांचे आकर्षण ठरत आहे.

शुक्रवार पेठ -
राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळाने वाराणसीच्या काशी विश्‍वेश्‍वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. अर्धे सोनेरी आणि अर्धे संगमरवरी रंगात उठून दिसणारे हे मंदिर आणि त्याची तब्बल ५० फूट उंची पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.

आवर्जून पाहावे असे... 
आवर्जून पहावे असे...
बालवीर मित्रमंडळ- जय मल्हार
जवान मित्रमंडळ- सर्कस
राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळ- काशी विश्‍वेश्‍वर मंदिर
श्री सुंदर गणपती तरुण मंडळ- स्वच्छतेचा श्रीगणेशा