चिखलीत देखाव्यांबरोबरच सामाजिक उपक्रमही

चिखली - चिखली परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक, सामाजिक देखाव्याबरोबरच जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम गणपती मंडळाकडून राबविले जात आहेत. त्याचबरोबर मुलगी वाचवा, शेतकरी आत्महत्या व उपाय, पाणी वाचवा या द्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच लावणी नृत्य, महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा, मुलासांठी नृत्य आदी स्पर्धांची मोठी रेलचेल पाहावयास मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात देखावे पाहावयास मिळत होते. त्या तुलनेत यंदा मात्र देखाव्यांची संख्या घटलेली पाहावयास मिळत आहे.

या वर्षी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाडूंच्या मूर्तीचा वापर व ध्वनी प्रदूषण आदी बाबींची काळजी घेतल्याचे दिसत आहे.

चिखली गावठाणातील हनुमान व्यायाम मंडळाने गणेश मूर्तीसाठी तयार केलेली फुलांची सजावट आणि काचेचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जितेंद्र यादव अध्यक्ष असलेल्या रामदासनगर येथील जय भवानी प्रतिष्ठाणच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. माजी नगरसेवक गीताराम मोरे यांच्या शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळाकडून फुलांची सजावट केली आहे. चिखली पाटीलनगर येथील श्रीराम मित्र मंडळाच्या येथील जगात भारी संस्कृती महाराष्ट्राची हा जिवंत देखावा सादर केला आहे. अमित मोरे मंडळाचे अध्यक्ष आहेत. 
सानेचौक येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कलच्या वतीने ‘राज्य शिवबाचे आणि महाराष्ट्र आपला’ हा जिवंत देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. नगरसेवक दत्ता साने या मंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हेत्रेवाडी येथील माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या गजानन म्हेत्रे प्रतिष्ठाणच्या वतीने अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन जरे आधारस्तंभ असलेल्या राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने ‘हरवलेला बाप’ हा सामाजिक विषयावर जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे.

मोरेवस्ती येथील स्वप्ननगरी मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान, आरोग्य शिबिर, त्याचबरोबर महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ओम साई मित्र मंडळाच्या वतीने मनोरंजनात्मक कार्यक्रम, अन्नदानाचे आयोजन केले असून विकास पवार अध्यक्ष आहेत. माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांच्या साई मित्र मंडळाच्या वतीने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सावकार चौकाचा राजा मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे मनोरंजन आणि महिला आणि मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मारुती जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत.  

कुदळवाडी येथील कुदळवाडी सामाजिक कार्यकर्ते विलास यादव अध्यक्ष असलेल्या भैरवनाथनगर मित्र मंडळाच्या वतीने दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येवर आधारित देखावा सादर केला आहे. तसेच भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने चिनी मालावर बहिष्कार हा जिवंत देखावा सादर केला  आहे. 

आहेरवाडी येथील जय बजरंग मित्र मंडळ आहेरवाडी तालीम यांच्या वतीने ‘नरसिंह अवतार’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. प्रदीप आहेर या मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
आहेरवाडी येथील हिंदवी स्वराज्य युवा मंच मंडळाच्या वतीने ‘दैना बळी राज्याची तगमग शिवरायांची’ हा सामाजिक देखावा सादर केला आहे. मंडळ आरतीसाठी आलेल्या पाहुण्यांना वडाचे झाड आणि अनाथांसाठी वही-पेन वाटप करत आहे. सचिन चव्हाण अध्यक्ष आहेत.

जाधववाडी मधला पेठ येथील श्री संत सावतामाळी तरुण मित्र मंडळाच्या वतीने ‘मातृपितृ सेवा हीच ईश्वर सेवा’ हा देखावा सादर केला. धीरज जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत. बोल्हाईमळा मधील सावतामाळी मित्र मंडळाच्या वतीने ‘कायदा आजचा व कालचा’ हा हलता देखावा सादर केला आहे. नारायण जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत. जाधववाडी वडाचामळा येथील श्री संत सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने केलेली आकर्षक फुलांची आरास व विद्युतरोषणाई केली आहे. ऋषीकेश जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com