शाहू मिलमध्ये अवतरली तब्बल 12 राज्यातील 200 कलाकारांची 'लोकसंस्कृती'
महाराष्ट्राच्या लावणीचा ठसका भारी ठरला. तर, पंजाबच्या भांगड्याने उपस्थितांना डोलायला भाग पाडले.
कोल्हापूर : ताल, लय व सुरांच्या त्रिवेणी संगमात सादर झालेल्या नृत्य प्रकारांनी अंतर्मनाचा ठाव घेतला. विविधतेत दडलेली भारतीय संस्कृतीची (Indian Culture) रुपेही नृत्यांतून प्रकट झाली. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद मिळाली.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, जिल्हा प्रशासन (Kolhapur) व राजर्षी शाहू फाऊंडेशनतर्फे झालेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) कृतज्ञता पर्व व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) लोककलांच्या आविष्कारातून राजर्षी शाहुंना अभिवादन करण्यात आले.
पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), जिल्हाधिकारी राहूल रेखावार, केंद्राचे प्रशासनाधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत त्याचे उद् घाटन झाले. शाहू छत्रपती मिलमध्ये त्याचे आयोजन केले होते.
१२ राज्यातील २०० कलाकार लोकनृत्य सादर करण्यासाठी आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. मिलमधील १० नंबरच्या सभागृहात सायंकाळी पाचपासूनच ते येत होते.
काश्मीरच्या रौफनृत्याची सुरवात होताच ते खूर्चीला खिळले. रंगबेरंगी पोशाख परिधान केलेल्या युवतींनी नृत्यातील सहजता सादर केली.
ताल, लय व सुरांच्या संगमातील त्यांच्या नजाकतभऱ्या हालचालींनी लक्ष वेधले. पांढरे धोतर व पायात घुंगरू बांधलेल्या छत्तीसगडच्या कलाकारांनी नृत्यात कसरती सादर केल्या. झांजच्या तालावर नृत्य सादर होताना त्याला टाळ्यांची दाद मिळाली.
कर्नाटक (Karnataka) हालाकी सुग्गी नात्यानेही वाहवा मिळवली. डोक्यावर विविध रंगी शंखाकार टोप्या घातलेल्या कलाकारांनी हातात टिपऱ्या वाजवून अप्रतिम सादरीकरण केले.
ढोल, संबळ, पावरी वाद्याची धूनवर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सोंगी मुखवटे नृत्य सादर झाले. त्यालाही दाद मिळाली. प्रेमभावनेचा आशय घेऊन आसामच्या कलाकारांनी बिहू नृत्यावरील जलद हालचाली कशा असतात, याची झलक दाखवली.
त्यानंतर महाराष्ट्रातील धनगरी गजनृत्याच्या ठेका चांगलाच घुमला. मध्य प्रदेशातील गुदुम बाजा, तर हरियाणामधील झुमर नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
महाराष्ट्राच्या लावणीचा ठसका भारी ठरला. पंजाबच्या भांगड्याने उपस्थितांना डोलायला भाग पाडले. त्याच बरोबर पोवाड्याने सभागृहात रोमांच उभे केले. (फोटो : बी. डी. चेचर)