नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्रिपुरातील विरोधी पक्षांवर मात करण्यासाठी आणि पक्षाअंतर्गत असंतोष कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्याला राज्य विधानसभा निवडणुकीत उतरविण्याची रणनिती आखली आहे. भाजपची हीच रणनिती यापूर्वी सुद्धा यशस्वी ठरली आहे. त्यानुसार विप्लवकुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही तासांतच पक्षाच्या माणिक साहा यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली.
उत्तराखंडमधील निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला. आता त्रिपुरामध्ये देखील पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इथं देखील मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री होणारे साहा हे ईशान्येकडील काँग्रेसचे चौथे माजी नेते आहेत.
आसामचे हिमंता बिस्वा शर्मा, अरुणाचल प्रदेशातील पेमा खांडू आणि मणिपूरमधील एन. बिरे सिंग हे मुख्यमंत्री देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलून, भाजपने लिंगायत समाजातून आलेल्या बीएस येडियुरप्पा यांच्या जागी दुसरे लिंगायत नेते बसवराज एस बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री केले.
भाजपने उत्तराखंडमध्ये दोन ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या जागी आणखी एका ठाकूर नेत्याची नियुक्ती केली.
गेल्या वर्षी आसाममधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या सर्बानंद सोनोवाल यांच्या जागी हिमंता बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्री केले होते.
भाजपने 2019 पासून गुजरात आणि कर्नाटकसह पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भाजपने विजय रुपानी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.