Eknath Shinde Birthday : CM शिंदे साहेबांना ओळखलंत का? कधी न पाहिलेले फोटो बघाच एकदा
Eknath Shinde Birthday : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. या बंडानंतर एकनाथ शिंदे हे नाव सर्वदूर परिचयाचे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती साता समुद्रापलिकडे पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचे समर्थक महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशात देखील पाहायला मिळत आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांचे हे काही दूर्मिळ फोटो बघा. अनेकांनी हे फोटो कदाचित बघितले नसतील.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला.
सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.
सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
एकनाथ शिंदे सीएमपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा अनेक विकास कामांकडे कल दिसून येतोय. त्यांच्या चाहत्यांनी तर अमेरिकेत टाइम्स स्केअरमध्ये आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे बॅनर झळकवले आहेत.