Joshimath Landslide : मंत्र्याचा थेट ISRO च्या संचालकांना फोन; वेबसाइटवरून तात्काळ हटवले 'ते' Photo
जोशीमठ भूस्खलनाबाबत इस्रोकडून अहवाल जारी करण्यात आला होता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) उत्तराखंड सरकारमधील मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या आदेशानुसार, जोशीमठ भूस्खलनाचे (Joshimath Landslide) फोटो वेबसाइटवरून हटवले आहेत. डॉ. रावत हे चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असून, सध्या जोशीमठ इथं तळ ठोकून आहेत.
मंत्री डॉ. धनसिंग रावत (Dr. Dhan Singh Rawat) यांनी सांगितलं की, जोशीमठ कोसळल्याबाबत इस्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि टीव्ही चॅनेलवर त्यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर, जोशीमठ परिरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी इस्रोच्या संचालकांशी फोनवर चर्चा केली. त्यांना विनंती केली की, 'इस्रोनं छायाचित्रांबाबत अधिकृत निवेदन जारी करावं किंवा तसं काही नसेल तर वेबसाइटवरून फोटो काढून टाकावीत.'
डॉ. रावत यांच्या म्हणण्यानुसार, इस्रोनं आता त्यांच्या विनंतीवरून ही छायाचित्रं वेबसाइटवरून हटवली आहेत. जोशीमठ भूस्खलनाबाबत इस्रोकडून अहवाल जारी करण्यात आला होता. यामध्ये 12 दिवसांत जोशीमठची जमीन 5.4 सेमी खचल्याचं सांगण्यात आलं. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरनं हे उपग्रह फोटो प्रसिद्ध केले.
इस्रोनं (Indian Space Research) प्रसिद्ध केलेल्या उपग्रह फोटोंमध्ये दिसून आलं की, जोशीमठ शहर 27 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 5.4 सेमी जमिनीखाली खचलं आहे.
12 दिवसांत शहर 5.4 सेंटीमीटरनं खाली गेलं. इस्रोच्या अहवालात जोशीमठमधील आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरालाही याचा फटका बसला आहे. जोशीमठ-औली रस्त्यालगत 2180 मीटर उंचीवर कोसळण्याचा केंद्रबिंदू आहे.
या फोटोमधून दहशत निर्माण होत आहे. इस्रोनं मला सांगितलं की, ते अहवाल अपडेट करतील. आता फोटो वेबसाइटवरून काढण्यात आल्याचंही रावत यांनी यावेळी सांगितलं.