मागील अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील बऱ्याच संस्था ऐतिहासिक पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती या मोहिमेचे आयोजन करतात. या मोहिमेसाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील अनेक शिवभक्त हजेरी लावतात. यावेळी कोल्हापुरातील हिल रायडर्स अँड हायकर्स फाउंडेशनतर्फे यंदाही या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यंदा कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील हे या मोहिमेत सहभागी झालेले पहायला मिळाले. पन्हाळ्यावरील ऊर्जादायी वातावरणात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोहिमेला सुरुवात झाली. याविषयी पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती देत प्रवासाचे वर्णन केले आहे.