कोल्हापूर : आदिशक्ती जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं स्थान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नूषा करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा बुधवारी मावळतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीनं मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
करवीर निवासिनी अंबाबाई (श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले.
कोल्हापुरला लाभलेली धर्मसत्ता, दैवसत्ता आणि राजसत्तेचा मिलाप असलेल्या या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने यंदा उंट, घोड्यांचा सहभाग, नगारे, ढोल ताशांचा गजर, पायलेटिंग पोलिसांचं संचलन, एकीकडं पालख्यांची मिरवणूक होती.
तर दुसरीकडून शाहू छत्रपती यांचं मेबॅक वाहनातून आगमन, देवीची आरती आणि शमी पूजन, बंदुकाच्या फैरी झाडून सलामी, आसमंतात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी असा नेत्रदीपक सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात पार पडला.
कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानं आजवर कधीही झाला नाही असा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला.
सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन झाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, संजय डी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. डी. टी. शिर्के, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह छत्रपती घराण्याशी संबंधित सरदार घराण्यांचे मानकरी उपस्थित होते.
साताऱ्यातही शाही दसरा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पाडला.
दसऱ्यानिमित्त उदयनराजेंनी खास पोशाख परिधान केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.