देवगांव रंगारी (जि.औरंगाबाद) : भारतीय लष्करात सतरा वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झालेले कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगांव येथील सुपुत्र फौजी सतपालसिंग शिवसिंग महेर यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा देऊन घोड्यावर बसवून जंगी मिरवणूक काढण्यात आली. देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या जवानास ताडपिंपळगांव येथील ग्रामस्थांनी अनोखा सॅल्यूट ठोकला आहे. सतरा वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते आपल्या मुळगावी परतले आहेत. ताडपिंपळगाव ग्रामस्थांनी जातपात, धर्म, पंथ गट-तट विसरून जल्लोषात मिरवणूक काढली.
प्रत्येकाच्या दारासमोर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळी, फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, हारतुरे, देशभक्तीपर गीते, ठिकठिकाणी महिलांनी केलेले औक्षण यामुळे संपूर्ण वातावरणच देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपुत महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष चत्तरसिंग महेर यांच्या अध्यक्षतेखाली सतपालसिंग महेर व पत्नी देवकाबाई यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
या जवानाचा मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सतपालसिंग महेर यांची २००४ देशसेवा करण्यासाठी भारतीय लष्कर दलात दाखल झाले.
त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ ला ते सेवानिवृत्त झाले आहेत. मेजर सतपालसिंग महेर पुढे म्हणतात, की भारतमातेची सेवा करून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी वाजत-गाजत केलेलं स्वागत अनोखे आहे.
या स्वागताने मी भारावून गेलो आहे.
आईवडील ग्रामस्थांनी दिलेले प्रेम आशीर्वाद व केलेले स्वागत यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन.
मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा व देशप्रेम शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच ठेवेल असे मत मेजर महेर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य रेणुका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास जाधव, राजपूत विकास महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष चत्तरसिंग महेर, सरपंच अरुण सोनवणे, उपसरपंच सतीश शेळके, रमेश जाधव, माजी सरपंच अलीम शेख, देवगांव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस उपनिरीक्षक देविदास खांडकुळे, जमादार आप्पासाहेब काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच कारभारी मुंजाळ, अजबसिंग राजपूत, शिवसिंग महेर, श्रीराम मुंजाळ, विष्णू करांगळे साहेबराव सोनवणे, बाळू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.