Latest Marathi News | वेगवेगळ्या अपघातात 3 ठार, 2 गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Accident news

Jalgaon News : वेगवेगळ्या अपघातात 3 ठार, 2 गंभीर

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. २४) गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावर सुसाट दुचाकी दुभाजकावर आदळून एक ठार, एक जखमी झाला.

रात्री आठला अजिंठा चौफुलीवर सुसाट ट्रकने दुचाकीस्वारला चिरडले. यात एक ठार, एक गंभीर जखमी झाला, तर पुष्पलता बेंडाळे चौकात सुसाट ट्रक अनियंत्रित झाल्याने चालकाने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. (3 killed, 2 seriously in different accidents jalgaon News)

हेही वाचा: Eknath Khadse : कृषी महाविद्यालयात मंजूर पदभरती करावी; हिवाळी अधिवेशनात मांडला प्रश्न

एमआयडीसी भागातील नगीन राठोड (वय ३८) आणि उदय राठोड (४०) सुनसगाव येथे कामानिमित्त गेले होते. रात्री आठच्या सुमारास ते दुचाकीने अजिंठा चौफुलीवर पोचले. तेथे थोडावेळ थांबून निघणार तोच आकाशीवाणीकडून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच ४०, बीजी ८९१५) त्यांना जोरदार धडक दिली.

यात नगीन ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला, तर उदय गंभीर जखमी झाला. दोघे बांधकाम आणि भंगार व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. महामार्गालगत असलेल्या दुकानदारांनी मदतीसाठी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसही घटनास्थळावर पोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात रवाना केला. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jalgaon News : धमकी दिल्याने एकाची आत्महत्या

उड्डाणपुलावर दुचाकी आदळली दुभाजकावर

गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी दुभाजकावर आदळून दोन मित्र कारच्या खाली येऊन ठार झाले. मयूर विठ्ठल लंके-साळुंखे (१९, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (२१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव), अशी मृतांची नावे आहेत. जळगावातील मित्राला भेटून मयूर आणि दीपक दुपारी एकच्या सुमारास घराकडे निघाले. गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्याने दोघे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस फेकले गेले आणि त्याच क्षणी ते चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर जागीच ठार झाला, तर दीपक याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दुपारी जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

बेंडाळे चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात सुसाट ट्रकचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका मागून एक वाहनांना धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला जिल्‍हा रुग्णालय, नंतर खासगी रुग्णालयात हलविले. अजिंठा चौकाकडून शहरात शिरताना ट्रक (एमएच १९, झेड ७६०) चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एका मागून एक वाहनांना धडकत ट्रक भारत पेट्रोपंपासमोरील देशी दारूच्या अड्ड्याजवळ आला असताना, अचानक ब्रेक लागला. ट्रकवरील चालक पळून जात असताना, त्याला जमावाने पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दुचाकीस्वारास नागरिकांच्या मदतीने जिल्‍हा रुग्णालयात नेले. तेथून खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

हेही वाचा: Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांच्या छाप्यात रेशनचा लाखोचा धान्यसाठा जप्त

टॅग्स :Jalgaonaccidentdeath