
Jalgaon Crime News : शहरातून एका दिवसात 3 वाहनांची चोरी; नागरिकांमध्ये घबराट
जळगाव : शहरातून दिवसाला किमान सात दुचाकींची चोरी होते. त्यापैकी एखादीच तक्रार पोलिस नोंदवून घेतात. उर्वरित चोरी प्रकरणात ‘शोधा, थांबा दोन- चार दिवसांत सापडेल’, असे उत्तर पोलिस देत तक्रारदारांना रवाना केले जाते.
महिला दिनी तीन दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे तिन्ही चोरीची ठिकाणे अत्यंत वर्दळी आणि मोक्याची असल्याने पोलिसांच्या कामचुकार वृत्तीमुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे.
मेहरूण परिसरातील जोशी वाड्यातील दिलीप भगवान कोळी (वय ४३) यांची दुचाकी (एमएच १९, बीई १७९७) १५ फेब्रुवारीला रात्री घराबाहेर नेहमीच्या जागी उभी केली होती. पहाटे चारपूर्वीच चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याबाबत ८ मार्चला एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक विकास सातदिवे तपास करीत आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नवीन बसस्थानकातून दिवसा चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. गुरूनानकनगरातील रहिवासी तसेच महापालिकेचे सफाई कर्मचारी अनिल विकास गोयर (वय ६०) ६ मार्चला रात्री दहाच्या सुमारास नवीन बसस्थानकात आले. त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९, डीएम ४०२७) बसस्थानकातील शौचालयासमोर उभी केली.
चोरट्याने ती लंपास केली. याबाबत अनिल गोयर यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहे. प्रभात कॉलनी चौकातील पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या भिंतीजवळून बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील जितेंद्र प्रकाश राजपूत यांची दुचाकी (एमएच १९, बीवाय ५६८२) चोरट्याने चोरून नेली.
हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
याबाबत रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहे.