
Jalgaon Crime: घरफोड्यांच्या पैशांवर ‘गाव पाटीलकी’चा रुबाब पडला महागात पडला. पांढरा शुभ्र सदरा-पायजमा, चकचकीत कार आणि अंगात पुढारी बाणा अंगीकारलेल्या अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तोच तोरा त्याने पोलिसांना दाखवला.
पण पोलिसांची ‘पाटीलकी’ या भामट्यावर भारी पडली अन् घडा उलटा करावा तसा त्याला उलटा करताच गुन्ह्यांची सरबत्तीच लागली.
सरपंच होण्यासाठी ३१ मोठ्या घरफोड्यांची कबुली एका मागून एक दिल्याने तपास पथकाच्या भुवया उंचावल्या. घरफोडीतील सोने, कार आणि इतर मुद्देमाल त्याने काढून दिला. (31 major burglaries to become Sarpanch jalgaon crime news)
बिलवाडी (ता. जळगाव) येथील रहिवासी प्रवीण सुभाष पाटील (वय ३२) हा तरुण गेल्या वर्षभरात गाव-तालुक्यासह, सार्वे (ता. पारोळा), डाम्हरुण (ता. चाळीसगाव) आणि विशेष करून नातेसंबंधातील गाव-खेड्यांमध्ये जाऊन तरुणांना आपल्या प्रभावी बोलण्यातून ‘इम्प्रेस’ करत होता. सामाजिक कामाच्या नावाखाली ‘देवा’ या नावाने ग्रुप तयार केला होता. अनेक तरुण त्याच्या संपर्कात होते. मात्र त्याच्या घरफोडीच्या धंद्यात त्याने अद्याप कुणाला सहभागी करून घेतले नाही, अशी माहिती समोर आली.
पैशांच्या उधळणीने वेधले लक्ष
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा नुकताच खाली बसला. बिलवाडी ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने प्रवीण पाटील याने स्वतःचे पॅनल उभे करून निवडणूक लढवली. काही वर्षांपूर्वी आपल्या डोळ्या देखत भटकणारा बेरोजगार प्रवीण पैशांची उधळण करतोय, स्वतः सरपंच होण्यासाठी त्याने निवडणुकीच्या दोन रात्रीतून १२ लाख रुपयांपर्यंत वाटप केल्याने संपूर्ण गावासह तालुक्याचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.
..अन् फुटले बिंग
गावातील तरुणांच्या पार्ट्या, मैफली संपल्या प्रवीण निवडणुकीनंतर बेकार झाला. तरी ‘ना गम ना पछतावा...' या उक्तीनुसार तो परतत होता. तोच रुबाब कायम असल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात हे सर्व खटकत होते. त्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील यांना लागली. दोन दिवस पाळत ठेवून प्रवीणला ताब्यात घेतले. पोलीस म्हणजे, किरकोळ असा दुराग्रह झाल्याने रुबाब दाखवता पोलिसांनी खाक्या दाखवत जळगावमध्ये आणले.
पाच वर्षांचा धंदा
प्रवीण हा साधारण पाच वर्षांपासून चोऱ्या-घरफोडी करत आहे. नातेसंबंधाच्या गावात दोन ते चार दिवस राहून ‘रेकी’ करायची अन् काम फत्ते करून पोबारा करायचा. प्रत्येक गुन्हा त्याने एकट्याने केल्याने आजवर तो पोलिसांना मिळून येत नव्हता. वाळूचा धंदा आहे, अशी बतावणी त्याने करून ठेवल्याने ग्रामीण भागात त्याच्यावर विश्वास होता. मात्र कोरोना काळानंतर तो सक्रिय होऊन ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहताच, त्याची कुंडली उघड झाल्याचे बोलले जात आहे.
‘व्हाईट कॉलर’चे स्वप्न धुळीस
राजकारणात येऊन प्रवीणला घरफोडीचा धंदा पूर्णतः सोडून द्यायचा होता. मात्र निवडणुकीत १२ लाखांचा चुराडा करुनही निम्म्यापेक्षा कमी मते त्याला मिळाली. तेथून त्याचे वाईट दिवस सुरू होऊन गुन्हे शाखेला कुणकुण लागली. वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्या पथकातील विजय पाटील, महेश महाजन, विजयसिंग पाटील यांनी प्रवीणचे बिंग फोडले असून बारा तासात ३१ घरफोड्यांची कबुलीत त्याने दिली.
प्रवीण पाटीलच्या गुन्ह्यांचा आलेख
० ३१ घरफोड्यांची कबुली
० १५० ग्रॅमच्यावर सोने
० १ स्वीफ्ट कार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.