
Jalgaon Crime News : मेहुणबारेत 68 हजारांचा तांदूळ पकडला; पोलिसांची संयुक्त कारवाई
मेहुणबारे (जि. जळगाव) : येथील डेराबर्डी भागात चाळीसगाव पुरवठा विभाग व पोलिसांनी टाकलेल्या संयुक्त छाप्यात काळ्याबाजारात जाणारा सुमारे ६८ हजार रूपये किमतीचा ३४ क्विंटल तांदूळ (६८ कट्टे, प्रत्येकी ५० किलोचे) पकडला. (34 quintals of rice worth around 68 thousand rupees going to black market was caught jalgaon crime news)
तांदूळ व मालवाहू चारचाकी वाहन असा सुमारे २ लाख ५८ हजारांचा ऐवज पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू सांगळे, हवालदार मोहन सोनवणे, नीलेश लोहार, सुदर्शन घुले, होमगार्ड साहेबराव चव्हाण, मोहन चव्हाण, जिभाऊ निकाळे, अप्पासाहेब पाटील, सोमनाथ झोडगे असे २० मार्चला रात्री मेहुणबारे गावातील डेराबर्डी भागात नाकाबंदी करत असताना झायलो कंपनीचा (एमएच १९ एस ८२८५) हा पांढऱ्या रंगाचा मालवाहू टेम्पो पिलखोड- वरखेड रस्त्याकडून येताना दिसला.
त्यावरील चालक स्वराज तुकाराम महाजन (वय ३५, रा. पेंढारपूरा, पारोळा) याच्याकडे या तांदळाबाबत पावती मागितली असता त्याने दिली नाही किंवा वाहतुकीचा परवाना त्याच्याकडे आढळून आला नाही. या वाहनातील तांदूळ हा रेशनचा असल्याने हे वाहन तांदळासह मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा करून सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी याबाबत चाळीसगाव पुरवठा विभागाला माहिती दिली.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
पुरवठा निरीक्षक राजेंद्र ढोले यांच्यासह पंच व मेहुणबारे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मालाचा पंचनामा केला असता ते शासकीय रेशन दुकानातील धान्य असल्याचे समोर आले. शासकीय बारदानातील सुमारे ६८ कट्टे (३४ क्विंटल) प्रत्येकी ५० किलो वजनाचे) किंमत ६८ हजार रूपये व वाहन किंमत १ लाख ९० हजार रूपये असा सुमारे २ लाख ५८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ढोले यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून स्वराज तुकाराम महाजन याच्याविरूद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.