
Jalgaon Crime News: केकत जळगाव येथे विहीरीवरून पाणी न आणल्याने पतीने केला पत्नीचा खून; पती गजाआड
पाचोड : पत्नीने विहीरी वरून पाण्याची भरलेली घागर आणली नसल्याचा राग येऊन पतीने काठीने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना केकत जळगाव (ता.पैठण) येथे ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (ता.२२) रात्री साडेआठ वाजता घडली. यासंबंधी पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी पतीला अटक केली.
यासंबंधी पाचोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी,केकतजळगाव (ता.पैठण) येथील शहादेव त्रिंबक बढे (वय ५५) याने त्याची पत्नी सुनिता उर्फ राधाबाई शहादेव बढे (वय ४० वर्ष) हीस विहीरीवरुन पाण्याची घागर घेऊन येण्यास सांगितले.
मात्र राधाबाईने घागर आणली नसल्याने पती शाहदेव बढे यास राग आला व त्याने काठीने डोक्यावर पायावर बेदम मारहाण केली.
यांत पत्नी राधाबाई हि मरण पावली. या घटनेची ग्रामस्थांना कुणकुण लागताच त्यांनी पाचोड पालिसाना या घटनेची कल्पना दिली.
माहिती मिळताच पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांचेसह प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सागळे,पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी आपल्या सहकार्यासमवेत रात्री नऊ वाजता केकत जळगाव गाठले व सर्व घटनेची माहिती घेतली.
मयत महिला राधाबाई बढे याची मुलगी प्रियंका विशाल जायभाये (वय 20 वर्ष) रा.डोणगाव (ता.अंबड,जि.जालना) आईचा बापाने खून केल्याचे समजताच ती तातडीने केकत जळगाव येथे आली.
राधाबाई बढे हिला नातेवाईक व पोलिसांनी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ. नोमान शेख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
गुरुवारी (ता.२३) सकाळी वैद्यकिय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी उतरणीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत राधाबाई बढेची मुलगी प्रियंका विशाल जायभाये (वय२०वर्ष) रा.डोणगाव (ता.अंबड,जि.जालना) हीने पित्याविरुद्ध तक्रार दिली.
तिच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी गुरुवारी (ता.२३) सकाळी शहादेव त्रिंबक बढे (वय ५५वर्ष) रा. केकत जळगाव (ता. पैठण) याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे करीत आहे.