
जळगाव : शहरात जवळपास सहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी साडेपाचशे किलोमीटर रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या व जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या निधीतून काही रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी या एकूणच सहाशे किलोमीटर रस्त्यांना सुस्थितीत आणून शहर खड्डेमुक्त करायचे असेल तर किमान पाचशे कोटींचा निधी एकरकमी आवश्यक आहे. सोबतच एकदा तयार झालेला रस्ता कोणत्याही स्थितीत पुन्हा खोदला जाणार नाही, याची हमीही गरजेची आहे. (500 crore needed for pothole removal No temporary repairs needed Latest Jalgaon News)
कधीकाळी खानदेशातील वैभव सांगितले जात असलेल्या जळगाव शहराची सात-आठ वर्षांपासून रस्त्यांमधील खड्ड्यांनी दुर्दशा झाली असून, यापेक्षा वाईट स्थिती आणखी काय व्हायची, असा प्रश्न उपस्थित होतोय. रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध असूनही केवळ राजकारण आणि नियोजनशून्य कारभारामुळे त्याचा योग्य विनियोग होत नसून त्याची शिक्षा जळगावकरांना नाहक भोगावी लागतेय.
चारही बाजूंनी वाढतेय शहर
जळगाव शहराची हद्द पूर्वेकडे खेडी, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत पश्चिमेकडे बांभोरीपर्यंत, दक्षिणेकडे मोहाडी व रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत, तर उत्तरेकडे शिवाजीनगरला कानळदा रस्त्यापर्यंत तर ममुराबाद गावापर्यंत अशी चारही बाजूंनी वाढतेय. नागरी वस्त्यांसह लहान- मोठ्या व्यापारी वस्त्याही विस्तारत आहेत.
५४ किलोमीटरचे क्षेत्रफळ
या चारही बाजूंनी वाढलेल्या जळगावचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरहून अधिक विस्तारले आहे. शहरातील प्रमुख, उपरस्ते व वस्त्यांमधील गल्लीबोळांतील रस्ते मिळून जवळपास ६०२ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यात ६४ किलोमीटर काँक्रिटचे, ३५९.४४ किलोमीटर डांबरी रस्ते, १२१.०८ किलोमीटर खडीचे, तर ५७.३७ किलोमीटर कच्चे रस्ते असे एकूण ६०२.३९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यापैकी जवळपास साडेपाचशे किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची वाहन चालू शकत नाही, अशी दुरवस्था झाली आहे.
एकही रस्ता खड्डेमुक्त नाही
एकमेकांना जोडल्या गेलेल्या काँक्रिट, डांबरी रस्त्यांचा विचार केला तर यापैकी एकही रस्ता सलग एक किलोमीटरपर्यंत खड्डेविरहित नाही. म्हणजे चांगल्या रस्त्यावर किमान एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरात आठ-दहा खड्डे आहेतच, अशी स्थिती आहे.
‘अमृत’ने केली दुरवस्था
२०१६ मध्ये अमृत योजनेचे पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. तत्पूर्वीही बहुतांश रस्ते खराब होते. या योजनेच्या खोदकामामुळे शहरातील १०० टक्के रस्ते खराब झाले, ते कायमचेच. गेल्या सात वर्षांत एकाही रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झाले नाही.
कोटींचा निधी खड्ड्यात
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींचा निधी दिला, परंतु त्याचे नियोजन अद्यापही झालेले नाही. त्यातील ४२ कोटींच्या निधीच नियोजन झाले, पण सरकार बदलले व या निधीला स्थगिती आली. नंतर स्थगिती उठली, पण पुन्हा सरकार बदलले. आता या ४२ कोटींच्या निधीतून प्रस्तावित रस्तेकामांचे बजेट ५८ कोटींपर्यंत वाढले. तरीही या कामांचा विषय मार्गी लागलेला नाही.
दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात शिवसेना सदस्याच्या प्रभागात करायच्या कामांसाठी ६८ कोटींचा निधी दिला होता, पैकी निम्म्याहून निधी खर्च झालाच नाही. नंतरच्या टप्प्यातही ४० कोटींच्या निधीतूनही कामांची लाइन लागायला तयार नाही.
एकरकमी पाचशे कोटी, कालमर्यादेचे नियोजन हवे
आता संपूर्ण शहरातील सर्वच रस्ते खोदले गेले आहेत. त्यामुळे या सर्व रस्त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी शे-दीडशे कोटी नव्हे, तर तब्बल पाचशे कोटींचा निधी आवश्यक आहे. शिवाय, रस्त्यांच्या कामासाठी वेळमर्यादा निश्चित करून वेळापत्रक आखले जाणेही गरजेचे आहे. तेव्हाच शहर खड्डेमुक्त होऊ शकेल. पण हाती असलेल्या शंभर कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे होत नाहीत, तर पाचशे कोटी कधी मिळणार व मिळाले तरी सुस्त मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याचा विनियोग कसा करतील, हा प्रश्नच आहे.
आकडे बोलतात...
शहराचे क्षेत्रफळ : ५४ चौरस किलोमीटर
एकूण रस्ते लांबी : ६०२.३७ किलोमीटर
काँक्रिटचे रस्ते : ६४ किलोमीटर
डांबरी रस्ते : ३९.९४ किलोमीटर
खडीचे रस्ते : १२१.०८ किलोमीटर
कच्चे रस्ते : ५७.३७ किलोमीटर
प्राप्त निधी व विनियोग
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून : १०० कोटी
प्राप्त निधी : ४२ कोटी
प्रस्तावित कामे : ४२ कोटी
अखर्चित निधी : ४२ कोटी
नियोजन समितीतून प्राप्त : ६८ कोटी
रस्ते/अन्य कामांसाठी खर्च : ४६ कोटी
अखर्चित निधी : २२ कोटी (अंदाजे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.