Unseasonal Rain : चोपड्यातील 485 हेक्टरवर नुकसान; संपामुळे पंचनाम्यासाठी फरफट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

562 hectares of agricultural crops were damaged due to unseasonal rains jalgaon news

Unseasonal Rain : चोपड्यातील 485 हेक्टरवर नुकसान; संपामुळे पंचनाम्यासाठी फरफट

जळगाव : जिल्ह्यात १५ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे ५६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

अवकाळीचा फटका चोपडा, पाचोरा, जळगाव, भुसावळ तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात बसला आहे. (562 hectares of agricultural crops were damaged due to unseasonal rains jalgaon news)

अद्यापही तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, संपात कृषी विभागाचेही कर्मचारी सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्‍न कृषी अधिकाऱ्यांसमोर उभा आहे.

संपामुळे बऱ्याचशा भागांमध्ये महसूल आणि कृषीचे कर्मचारी पोचलेले नाहीत. पंचनाम्याची मागणी होत आहे. रब्बीच्या नुकसानीबाबत एकरी नुकसानीची रक्कम घोषित झालेली नाही. सरसकट मदत होणार का, याबाबतही साशंकता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

रब्बीची ई-पीक पाहणी लावलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेती शिवारात कुणीही फिरकत नसल्याची सद्य:स्थिती आहे. शासनाने वेगळ्या यंत्रणेमार्फत पंचनामे करावेत. अत्यावश्यक सेवा म्हणून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

राष्ट्रवादी युवकतर्फे निवेदन

तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे त्वरीत करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख महेश सोनवणे, युवक शहराध्यक्ष रणजीत चावरिया, गटप्रमुख लक्ष्मण सपकाळे, शहर कार्याध्यक्ष विशाल ठोके, तालुका कार्याध्यक्ष अनिस खान लोधी, तुषार चौधरी आदींनी तहसीलदारांना निवेदन दिले.

रब्बीही बुडाला

परतीच्या पावसाने नुकसान केले. मात्र नदी नाले दुथडी भरून वाहिले. विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. अद्यापही बऱ्याच भागात टिकून आहे. रब्बीचे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढले आहे.

आता रब्बी काढणीचा हंगाम सुरू झाला. अन्‌ अवकाळीचा फटका बसत आहे. पंजाब, हरियानातील व स्थानिक हार्वेस्टर काढणीच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पण पावसाने नुकसान झाल्याने, हार्वेस्टरने काढणी करणे कठीण झाले आहे. रब्बी बुडालाय. अन्‌ मजुरांनाही हाताला काम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दोन दिवसांत ५६२ हेक्टरवर नुकसान

जळगाव जिल्ह्यात १५ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे ५६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात हरभरा, बाजरी, गहू, मका व ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा या तालुक्यांत एकूण ४६ गावे बाधित झाले असून, ६२६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. केळी, लिंबू पिकांची काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.