
Jalgaon News : भंगार बाजारातील 85 टपऱ्या हटविल्या; पोलिस बंदोबस्तात कारवाई
जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली रस्त्यावरील भंगार बाजारच्या ८५ टपऱ्या हटविण्यात आल्या, तर मुख्य अजिंठा चौफुलीच्या आजूबाजूचेही अतिक्रमणही मंगळवारी (ता. ७) हटविण्यात आले.पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
शहरातील अजिंठा चौफुली मार्गावर भंगार बाजाराचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे वाहतुकीसही मोठा अडथळा निर्माण होत होता, तर हीच परिस्थिती अजिंठा चौफुलीचीही होती.
त्या ठिकाणीही चाारही बाजूने अतिक्रमण झाले होते. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची महापालिकेकडे मागणी झाली होती. (85 tapri shop of scrap market removed Ajintha Chaufuli also released Action in police security Jalgaon News)
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
आयुक्तांची उपस्थिती
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात सकाळी अकरापासून अतिक्रमण हटविण्याची कारवाईस सुरवात केली. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. एस.टी. वर्कशॉपपासून तर थेट अजिंठा चौफुलीपर्यंत असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. काही अतिक्रमण स्वत: अतिक्रमणधारकांनीच काढून घेतले होते.
दोघांचा वाद, पोलिसांची कारवाई
अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. या वेळी दोन अतिक्रमणधारकांनी कारवाई करण्यास विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे संजय ठाकूर यांनी सांगितले, की या रस्त्यावरील तब्बल ८५ टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. तसेच अजिंठा चौफुलीच्या आजूबाजूचेही अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्या ठिकाणीही अतिक्रमणधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.