
जळगाव : सुरतमध्ये (गुजरात) जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून फरार झालेला सल्ल्या ऊर्फ सुनील पाटील याने पुन्हा गँग उभारून जिल्ह्यात खून, दरोडे, जबरी लुटी सारख्या गुन्ह्यांची सरबत्ती केली होती. गुन्हा करून येताना दुचाकीचा अपघात झाला अन् त्याच्या प्रेयसीच्या घरी तो आराम करत असतानाच गुन्हे शाखेच्या सशस्त्र पोलिसांनी धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. त्याने हातातून निसटून जाण्याचा प्रयत्नही केला मात्र, डोक्यावर पिस्तूल अन् जखमी असल्याने त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. (Latest Marathi News)
सुरत येथे खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तसेच महाराष्ट्र व गुजरात दोन्ही राज्यातील रेकॉर्डवरील वॉण्टेड गुन्हेगार सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (वय ३५, रा. बालाजी शाळेजवळ, अशोकनगर पारोळा) याला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने अटक केली आहे. कोरोना कालखंडात गुजरात कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने पुन्हा तोच लूटमार, दरोडे आणि घरफोडीचा धंदा सुरु केला होता. त्याच्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात ८ जून रोजी बेकायदा पिस्तुलाच्या जोरावर लुटमारीचा गुन्हा दाखल होता. अटकेतील सल्या ऊर्फ सुनील पाटील याची गुजरातसह महाराष्ट्रातही प्रचंड दहशत असून दोन्ही राज्यांच्या पोलिसांना गेल्या सहा महिन्यांपासून तो गुंगारा देत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्याच्या अटकेसाठी विशेष पाठपुरावा चालवला होता.
प्रेयसीचा पाहुणचार अन् उपचार
चित्रपटाला शोभेल अशा कथानकाप्रमाणे सल्ल्याने फरारी कालखंडातही गुन्हे सुरुच ठेवले होतो. गुन्हा करून पारोळा तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्यास असलेल्या त्याच्या प्रेयसीकडे जात असताना त्याचा अपघात झाल्याने तो जखमी झाला. जायबंदी असतानाही त्याने अटकेच्या भीतीने कुठल्याच दवाखान्यात ॲडमिट न होता प्रेयसीच्या घरात बस्तान मांडले होते.
निसटण्याचा प्रयत्न अन्
प्रेयसीच्या घरी त्याच्यावर उपचार सुरु होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खबऱ्याने त्याची टीप दिली. वायुगतीने गुन्हे शाखेच्या पथकातील अशोक महाजन, विजयसिंग पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, भगवान पाटील, नितीन बाविस्कर अशांच्या पथकाने कुसुंबा गावात धडकत त्याच्या ठिकाणाला वेढा घातला. सल्ल्यावर झडप घालताच तो निसटण्याच्या बेतात होता. पण, पिस्तुलाच्या निशाण्यावर असल्याने त्याची पळायची हिंमत झाली नाही.
महाराष्ट्र केसरीत चौथ्या स्थानावर
मानाची असलेली महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत सल्ल्या ऊर्फ सुनील पाटील हा चौथ्या स्थानापर्यंत पोहचला होता. मात्र, परिस्थितीने अशी कलाटणी घेतली की, एका सधन कुटुंबातील बलदंड शरीरयष्टीचा सुनील पाटील केव्हा गुन्हेगारी जगताचा सल्ल्या बनला त्याला स्वतःला कळलेदेखील नाही. सुरत, अहमदाबादसह महाराष्ट्रातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहे.