Jalgaon News: विकासाचा अंबरनाथ पॅटर्न जळगावात पक्चंर; रुग्णवाहिकाच आजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon News: विकासाचा अंबरनाथ पॅटर्न जळगावात पक्चंर; रुग्णवाहिकाच आजारी

जळगाव : खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलेला अंबरनाथचा विकास पाहण्यासाठी जळगावचे नगरसेवक गेले आहेत. मात्र, दुसरीकडे याच पॅटर्न अंतर्गत जळगावात आलेली शिवसेनेची अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका मात्र आजारी अवस्थेत पडली आहे.

शिवसेनेत फूट पडण्याअगोदर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनमार्फत जळगावकरांसाठी एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आली होती. ठाणे जिल्हा, तसेच अंबरनाथ व इतर भागांत वैद्यकीय सेवेंतर्गत अशा रुग्णवाहिका सुरू आहेत. त्या अंतर्गत जळगावातही अत्याधुनिक कार्डियाक सुविधा असलेली रुग्णवाहिका देण्यात आली होती, तसेच प्रथोमचार बॉक्सही कार्यालयांना देण्यात आले होते.

अशाप्रकारचा वैद्यकीय क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात होते. अत्याधुनिक सुविधांनी असलेल्या या रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन मोठ्या थाटात झाले. त्यानंतर ही रुग्णवाहिका रस्त्यावर दिमाखात धावू लागली. अवघ्या काही दिवसांत शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे तब्बल ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले.

जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेचे चारही आमदार पक्षाबाहेर पडले. पुढे त्यांची ओळख शिंदे गट शिवसेना म्हणून झाली. भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. याच काळात शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडे असलेली ही रुग्णवाहिका शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे मागवून घेतली. त्यावेळी दोन्ही गटांचा जोरदार वाद झाला.

अखेर ही रुग्णवाहिका शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. एवढा वाद करून घेतलेली ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजच्या स्थितीत ही रुग्णवाहिका पक्चंर स्थितीत स्वत:च आजारी आहे.

मु. जे. महाविद्यालय रस्त्यावर एका बंगल्याबाहेर बेवारस अवस्थेत ही रुग्णवाहिका उभी आहे. आता या रुग्णवाहिकेकडे कोणाचेही लक्ष नाही. राज्यात शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. मात्र, ही रुग्णवाहिका सुरू करून जनतेच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे.

अंबरनाथ विकास पॅटर्नची पाहणी

जळगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अंबरनाथ पॅटर्नचा विकास पाहण्यासाठी गेले आहेत. अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या आमत्रंणावरून हे नगरसेवक पाहणीसाठी गेले आहेत. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनाही विकासकामांची पाहणी करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.