Latest Marathi News | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण DPR तयार करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amrut Phrase 2.0

अमृत टप्पा क्रमांक 2.0 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण DPR तयार करणार

जळगाव : शहरात पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना टप्पा क्रमांक दोन राबविण्याकरिता विकास आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच ठराव मंजुरीसाठी विशेष महासभा घेण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेत गुरुवारी (ता. १३) सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली. आमदार सुरेश भोळे या वेळी उपस्थित होते.

अमृत टप्पा क्रमांक दोन शहरात राबविण्यासाठी विकास आराखडा तयार करावयाचा आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबत महासभेत चर्चा करण्यात आली होती. प्रशासनातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता, तर नगरसेवकांकडून अमृतचा टप्पा क्रमांक एक ज्या निसर्ग संस्थेकडून करण्यात आला त्याच संस्थेकडून अहवाल तयार करण्यात यावा, असे मत होते. याबाबत एकमत होत नसल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत यावर निर्णय घेण्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सुचविले होते.(Amrut Phase No 2.0 Maharashtra Life Authority will prepare DPR jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon : पोलीस मिळेना, अतिक्रमण हटेना!

सतराव्या मजल्यावर महापौरांच्या दालनात महापौर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या वेळी आमदार सुरेश भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ॲड. दिलीप पोकळे, ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, सरिता नेरकर, माजी नगरसेवक अमर जैन, तसेच महापालिकेचे शहर अभियंता पी. एम. गिरगावकर, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे, चंद्रकांत सोनगिरे, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.

‘मजिप्रा’ डीपीआर करणार

बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेकडून ‘डीपीआर’ बनविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याला महापालिका अधिकारी सहकार्य करतील, असे एकमताने ठरविण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार डीपीआर तयार करण्यात येऊन त्यानुसारच प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी ठराव करणे आवश्‍यक असल्याने लवकरात लवकर महासभा घेण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा: Jalgaon : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुंटणखान्यावर धाड

सर्वसमावेशक सूचनांचा समावेश : आमदार भोळे

आमदार सुरेश भोळे यांनी विकास आराखड्याबाबत बोलताना सांगितले, की विकास आराखडा सर्वसमावेशक करण्यात यावा, त्यात नगरसेवक तसेच टप्पा क्रमांक एकचे मक्तेदार जैन उद्योगसमूहाने मांडलेल्या सूचनांचाही समावेश करण्यात यावा. यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सर्व आवश्‍यक सहकार्य करावे.

मंजुरीसाठी आमदार प्रयत्न करतील : महापौर महाजन

महापौर जयश्री महाजन यांनी या वेळी बोलताना सांगितले, की सुधारित आराखडा करण्यासाठी आपण लवकरात लवकर महासभा घेणार आहोत, त्यासाठी आपण निर्देशही देत आहेत. महासभेत ठराव मंजूर करून त्यानंतर प्रस्ताव तयार करून तो आपण तातडीने

मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहोत. काही त्रुटी राहिल्यास त्या दूर करून त्याला मंजुरी मिळविण्यासाठी आमदार भोळे प्रयत्न करतील. बैठकीत नगरसेवकांनी तसेच अधिकाऱ्यांनीही आपले मत व्यक्त केले. सर्वसमावेशक चर्चा करून अमृत योजनेचा टप्पा क्रमांक दोन मार्गी लावण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Jalgaon : जिल्हा दूध संघात लोणी साठ्याचा सव्वा कोटीचा गैरव्यवहार