Jalgaon News : आम्ही ‘सुपर थर्टी’त विद्यार्थ्यांची निवड करताना त्यांच्यातील गुणवत्ताच नव्हे, तर त्यापेक्षाही त्यांच्या संघर्षमय जीवनातून बाहेर येण्याची त्यांची जिद्द, सचोटी पाहतो. शैक्षणिक चळवळीत सुरेशदादा जैन यांचे दातृत्व उल्लेखनीय आहे.
त्यामुळे भविष्यात एसडी-सीडच्या माध्यमातून ‘सुपर थर्टी’ची चाचणी घेऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, असा मानस गणिताचे प्राध्यापक पद्मश्री आनंद कुमार यांनी व्यक्त केला.(Anand Kumar statement of will test Super Thirty through SD Seed scholarship 2023 jalgaon news)
एसडी-सीडतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मंगळवारी (ता. २१) संभाजीराजे नाट्यगृहात हा सोहळा झाला. सोहळ्यानंतर आनंद कुमार यांची मुलाखत घेण्यात आली. त्यातून त्यांनी त्यांचा जीवनपट उलगडला.
अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, माजी कुलगुरू प्रा. डॉ. के .बी. पाटील, माजी मंत्री ज्येष्ठ नेते तथा या शिष्यवृत्ती संकल्पनेचे जनक सुरेशदादा जैन, रत्ना जैन, माजी महापौर रमेश जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, मिनाक्षी जैन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल तिलकपुरे यांनी त्यांच्या नृत्य समूहाच्या नृत्याविष्काराद्वारे गणेश वंदना सादर केली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात प्रसन्नकुमार रेदासनी यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांमधून काहींचे मनोगत चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले.
आईच्या प्रेरणेतून योजना : जैन
सुरेशदादा जैन यांनी या शिष्यवृत्ती योजनेबद्दल भावना व्यक्त केली. आईच्या स्मृतीला उजाळा देताना त्यांच्या प्रेरणेतून ही शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
गुणवत्ता असून आर्थिकदृष्ट्य़ा सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या भागातून चांगले अभियंते, डॉक्टर, आयएएस, आयपीएस, संशोधक घडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वंचितांसाठी विद्येचे दालन : मुथा
सोळा वर्षांपूर्वी सुरेशदादा जैन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना जळगावसारख्या ग्रामीण भागातील वंचित परंतु गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. ज्यांच्याकडे उच्च शिक्षणासाठी पैसे नाहीत, त्या वंचितांना ही योजना विद्येचे दालन म्हणून उपयुक्त ठरतेय.
जळगाव जिल्ह्यातून आगामी काळात किमान १०० आयएएस, आयपीएस घडतील, अशी दूरदृष्टी ठेवून आखलेल्या या योजनेबद्दल सुरेशदादांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे शांतीलाल मुथा म्हणाले.
जिद्द, सचोटीची कसोटी
शिष्यवृत्ती वितरणाच्या कार्यक्रमानंतर संवादक व मुलाखतकार मंगला खाडीलकर यांनी आनंद कुमार यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. आनंद कुमार यांनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत तरुणांना यशस्वी करिअरची दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला.
जळगावसारख्या ग्रामीण भागात ‘टॅलेंट' आहे, त्याला आर्थिक अडचणी असतील, तर त्या दूर करण्याचे उदात्त कार्य सुरेशदादा जैनांच्या माध्यमातून होते, याचे कौतुक वाटते. आम्ही ‘सुपर थर्टी’त विद्यार्थी निवडताना त्यांची जिद्द व सचोटी, परिश्रमांची तयारी या
गोष्टींना अधिक प्राधान्य देतो. अशा कसोटीतून खरे हिरे निवडले जातात. हे विद्यार्थी केवळ त्यांच्या व्यक्तिगत जीवनातच यशस्वी ठरत नाहीत तर देशाच्या विकासातही योगदान देतात, असे आनंद कुमार यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.