जळगाव : मुडी, मांडळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीस मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Canal

जळगाव : मुडी, मांडळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीस मान्यता

अमळनेर - पांझरा नदीवरील मुडी व मांडळ फड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी राज्याच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, अमळनेर तालुक्यातील पांझरा काठच्या गावांना याचा फायदा होणार आहे. एकावेळी दोन्ही गावांच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार असून, मुडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाख, तर मांडळ बांधाऱ्यासाठी १ कोटी १० लाखांच्या रकमेस मान्यता मिळाली आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रात त्या खालील फड पद्धतीच्या बंधाऱ्याच्या सिंचनासाठी समावेश आहे.

मुडी आणि मांडळ फड बंधारे न्याहळोद गावाच्या खालच्या बाजूस धुळे शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहेत. सद्य:स्थितीत बंधाऱ्याची स्थिती चांगली असून, कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटल्या असून, कालव्यावरील बांधकाम व विमोचकांची दुरुस्ती व नव्याने बांधणी करणे क्रमप्राप्त आहे. यामुळे दोन्ही बंधारे दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. दरम्यान, दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी दिल्याने आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले, तर पांझरा काठावरील शेतकरी व जनतेने आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार मानले.

असा आहे मुडी बंधारा

मुडी फड बंधाऱ्याचे सिंचन क्षेत्र १६७ हेक्टर असून, मुख्य कालवा ९.४० किलोमीटर लांबीचा आहे. त्यावरील वितरीका एक १.२५ किलोमीटर लांबीची असून, वाढविस्तार वितरिका १.८ किलोमीटर लांबीची आहे. त्याद्वारे भाल्या नाल्याचे पांझरा नदीमधून पुनर्भरण करण्यासह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करण्याचे प्रयोजन आहे. या बंधाऱ्यात नदी एस्केप बांधणे, कालवा पक्ष भिंत बांधणे, रस्ता क्रॉसिंग बांधणे, मुख्य कालवा व वितरिका क्रमांक एकचे विमोचक बांधणे, मुख्य कालवा व वितरिका क्रमांक दोनचे विमोचक बांधणे, मुख्य कालव्याचे लोखंडी फळ्याचे क्रॉस, रेग्युलर व मायनरचे विमोचक बांधणे, मुख्य कालवा रस्ता क्रॉसिंग बांधणे आदी कामांचा समावेश केला आहे.

मांडळ बंधाऱ्याचे वैशिष्ट्य

मांडळ बंधाऱ्याची स्थिती चांगली असून, कालव्याच्या नदीकडील भिंती काही ठिकाणी तुटल्या आहेत. कालव्यावरील बांधकाम व विमोचकांची दुरुस्ती व नव्याने बांधणी क्रमप्राप्त आहे. मांडळ फड बंधाऱ्याचे सिंचन क्षेत्र १९९ हेक्टर असून, मुख्य कालवा ८.४५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यावरील वितरिका एक १.०५ किलोमीटर लांबीची असून, वाढविस्तार वितरिका ०.८८ किलोमीटर लांबीची आहे. त्याद्वारे भाल्या नाल्याचे पांझरा नदीमधून पुर्नभरण करण्यासह सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करण्याचे प्रयोजन आहे.

Web Title: Approval For Repairing Mundi Mandal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncanalapproval
go to top