Jalgaon : शिंदखेड्यात एटीएम फोडले; ३६ लाखांवर रक्कम लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शिंदखेड्यात एटीएम फोडले; ३६ लाखांवर रक्कम लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा : येथील स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी ३६ लाखांवर रक्कम लांबविली. ही घटना रविवारी (ता. १४) दुपारी उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक मागविले आहे. फिंगरप्रिंट एक्स्पर्टही दाखल झाले आहेत. याबाबत येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

येथील शिरपूर रोडलगत स्टेट बँकेची शाखा आहे. बँकेला लागूनच बँकेचे एटीएम आहे. एटीएममध्ये शुक्रवारी (ता. १२) ३९ लाख रुपये लोड केले होते. ३६ लाख ८६ हजार ५०० रुपये मशिनमध्ये शिल्लक होते. चोरट्यांनी एटीएम मशिन लेझरच्या सहाय्याने फोडून रक्कम लांबविली आहे. एटीएमच्या आजूबाजूस बँकेचे तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, यातील एका कॅमेऱ्यावर चोरट्यांनी स्प्रे मारला आहे. तर अन्य दोन्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून त्यांच्या वायरी तोडल्या आहेत. अलार्मच्याही वायरी चोरट्यांनी तोडल्या आहेत. रविवारी दुपारी बाराला बँकेचे उपव्यवस्थापक अविनाश पगारे यांच्या लक्षात ही बाब आली.

त्यांनी त्वरित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. शिंदखेडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, अनिल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिंदखेड्याचे निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक गजानन गोटे यांच्यासह श्वानपथकातील किरण निकम, गोरख मंगळे घटनास्थळी दाखल झाले. श्वान बँकेच्या आवारातच फिरले. रस्ता सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सद्यःस्थितीत फिंगरप्रिंट एक्स्पर्टच्या मदतीने घटनेचा तपास सुरू आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एटीएम मशिन बंद असल्याचा मेसेज शनिवारी सकाळी साडेनऊला मुंबईहून बँकेच्या अधिकाऱ्यांना आला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी पुन्हा मेसेज आल्यामुळे श्री. पगारे एटीएम मशिन दुरुस्तीसाठी आले आणि त्यांच्या लक्षात ही घटना आली. चोरट्यांनी एटीएम मशिन केंद्राचे शटर बंद करून गेले. शनिवारी बँकेला सुटी असल्याने शटर बंद असल्या कारणाने एटीएम बंद असेल, असे गृहीत धरून अनेक ग्राहक येथे येऊन परत गेले.

loading image
go to top