
Jalgaon Accident News : अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले
जळगाव : गिरणा नदीवरील बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोर मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकींची धडक झाली.
यात रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून भरधाव अज्ञात वाहन गेल्याने तो जागीच ठार झाला. दीपक सुरेश नन्नवरे (वय २०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Bike rider crushed by unknown vehicle Jalgaon accident news)
मंगळवारी सांयकाळी दीपक नन्नवरे मित्र ललित गोकुळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावाकडून बांभोरीला दुचाकीने येत होते. बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोर समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत दीपक नन्नवरे रस्त्यावर पडला. त्याचवेळी बांभोरीकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दीपक नन्नवरे याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला, तर ललित पाटील गंभीर जखमी झाला. बांभोरी ग्रामस्थांनी व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
जखमी ललितला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांसह मित्रांची मोठी गर्दी झाली होती. मृताच्या पश्चात आई सरला, वडील सुरेश नन्नवरे, मोठा भाऊ राकेश आणि लखन असा परिवार आहे.