
Jalgaon News : भाजप मनपा गटनेते बालाणींचा नगरसेवकपदाचा राजीनामा
जळगाव : महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) गटनेते भगत बालाणी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. (BJP municipal group leader Balani resigns from post of corporator jalgaon news)
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे मंगळवारी (ता. २८) त्यांनी राजीनामा दिला. त्यात म्हटले आहे, की मी भगतराम रावलमल बालाणी प्रभाग १६ ‘अ’मधून निवडून आलो आहे.
स्वेच्छेने आपण आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहोत. आपला राजीनामा स्वीकारावा. दरम्यान, राजीनाम्यात त्यांनी राजीनामा देण्याचे कोणतेही कारण नमूद केलेले नाही. ते भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेतेही होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचेही सांगण्यात येत आहे.
भगत बालाणी महापालिकेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जाखनीनगर, सिंधी कॉलनी या प्रभाग १६ ‘अ’मधील राखीव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी केला होता.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्यावरून श्री. बालाणी यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केली होती व त्यांचे जात प्रमाणपत्र अपात्र असल्याचा निर्वाळा दिला होता, तसेच त्यांच्यावर कारवाईचा आदेशही दिला होता.
त्याबाबत चेतन शिरसाळे यांनी महापालिकेलाही माहिती दिली व त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती, तसेच त्यांनी घेतलेल्या सवलतींचा खर्चही वसूल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी राज्य शासनास कळविले आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय आलेला नसल्याचे सांगण्यात आले.