
चाळीसगाव : मागील काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. शहरातील दयानंद हॉटेलजवळील मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर पाचोरा तालुक्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रात्री जोरदार पाऊस झाला. कजगाव (ता.भडगाव) परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.
मागील वर्षी शहरासह तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने क्षणात होत्याच नव्हते केले. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांसह जनावरे वाहून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे अतिवृष्टीचा तडाखा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात शासनाने अद्याप नुकसानग्रस्तांना भरपाई दिलेली नाही.
म्हणून अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना गतवर्षी तब्बल ७ वेळा पूर आला.(Bridge Under Water in Chalisgaon Due to heavy rain Jalgaon News)
या पुराचा पाणी अनेकांच्या घरात घुसला होता. गुरुवारी (ता. ६) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. दयानंद हॉटेलजवळील मोठा पूल पाण्याखाली गेला असून, पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.
यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे. पावसाने असाच जोर धरल्यास वित्तहानीसह जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
पाचोऱ्यात पिकांचे नुकसान
पाचोरा शहर व परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, यामुळे तोंडाशी आलेला खरीप उत्पादनाचा घास नष्ट झाला आहे.
गुरुवारी (ता.६) रात्री विजेच्या कडकडाटासह शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपासून देखील कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी ,बाजरी या खरीपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात अडकला आहे.
कजगाव परिसराला झोडपले
कजगाव (ता. भडगाव) परिसरात शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री व सायंकाळपासून तब्बल दोन तास झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे गावातील तितूर नदी, ओढे, नाल्यांना पूर आला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. अनेक पिके पाण्याखाली आली असून, पावसामुळे काढणीवर आलेले पिके वाया जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.