सख्ख्या भावांनीच केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या; आई-वडिलांसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल | brother killed sister with axe case registered against four including parents Jalgaon Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Jalgaon Crime: सख्ख्या भावांनीच केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या; आई-वडिलांसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : तोंडापूर परिसराला लागून असलेल्या अजिंठा डोंगर रांगेत राक्षा (ता. सोयगाव) शिवारात एका महिलेचा कुऱ्हाडीच्या सहाय्याने खून केल्याची घटना उघडकीस आली होती.

फर्दापूर पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांतच छडा लावला असून, दोन सख्ख्या भावांनीच प्रेम संबंधांच्या संशयावरून सख्ख्या बहिणीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. (brother killed sister with axe case registered against four including parents Jalgaon Crime)

चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे भाऊ कृष्णा आणि शिवाजी बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई यांच्याविरूद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रकला यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या आई-वडील आणि भावांना होता. शनिवारी (ता. १६) सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय ३०, रा. तोंडापूर) हे आपल्या शेतात काम करत होते.

त्याचवेळी चंद्रकलाबाई धावतच तेथे आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी, ‘माझे भाऊ आणि आई-वडील माझा जीव घेणार आहेत. मला वाचवा, कोठे तरी लपवा’ अशी विनवणी केली असता, शमीम यांनी त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

काही वेळात तिचे दोन्ही भाऊ हाती कुऱ्हाड घेऊन धावतच तेथे आले. त्यांनी शेडमध्ये लपलेल्या चंद्रकला यांना मारहाण सुरु केली व कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात घाव घातले.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांचे आई-वडिलदेखील तेथे आले. त्यांनी शमीम यांनाही मारहाण करत, चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे दोन्ही मुलांना सांगितले. शमीम यांनी त्यांच्या तावडीतून सुटून थेट पहूर पोलीस ठाणे गाठल्याने त्यांचा जीव वाचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांची घटनास्थळी भेट...

शमीम यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर पहुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, अमोल गर्जे, बनसोडे आदींसह पथक घटनास्थळी पोहचले.

मात्र, हा परिसर फर्दापूर पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना कळविताच फर्दापूरचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे हेदेखील पथकासह दाखल झाले. सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांनी दखल घेतली असती, तर...

चंद्रकलाबाई बावस्कर यांनी गेल्या ९ ऑगस्टला पहुर पोलिसांत आई-वडील व दोन्ही भाऊ आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार दिली होती.

या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगत पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचे समजते.

चंद्रकलाबाई ह्या तब्बल चार वेळेस तक्रार करण्यास गेल्या. मात्र, त्यांच्या तक्रारींची पोलीसांनी दखल घेतली नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.