Latest Marathi News | खडकदेवळ्यात बनावट पोटॅश खत प्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakdevla.(Pachora): Officials of Agriculture Department seized fake potash fertilizer from Swami Agricultural Center

Jalgaon : खडकदेवळ्यात बनावट पोटॅश खत प्रकरणी गुन्हा दाखल

पाचोरा : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील स्वामी कृषी केंद्रात इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचा बनावट म्युरेट ऑफ पोटॅश खताचा साठा आढळला असून, कृषी विभागाने हे बनावट पोटॅश खत जप्त करून पाचोरा पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामी कृषी केंद्रात जिल्हा गुण नियंत्रक अरुण तायडे यांनी भेट देऊन तपासणी केली असता म्युरेट ऑफ पोटॅश खताचा साठा आढळला. त्याबाबत संशय असल्याने त्यांनी खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.(Case registered in case of fake potash fertilizer in Khadakdeola Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : 1 लाखासाठी विवाहितेचा छळप्रकरणी चाळीसगावात गुन्हा दाखल

इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे शिवाजी ढवरे यांनी खताच्या पिशव्यांचे फोटो काढून ते कंपनीकडे पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, या खतात ६० ऐवजी केवळ १५.४० टक्के पोटॅश असल्याचे सिद्ध झाले.

खतांच्या पिशव्यांवरील बॅच व लॉट नंबर देखील अधिकृत कंपनीचे नसल्याने खत साठा बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी अधिकारी वैभव शिंदे, अरुण तायडे, विजय पवार, मारुती भालेराव, अशोक जाधव यांनी याप्रकरणी साठा जप्ती व पोलिसात तक्रार कारवाई केली असून, सुनील सिनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Agriculture Update : ‘Recovery’ चांगली आल्यास ऊस दरवाढ होईल