Jalgaon News : वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगावात होणार केंद्र; जागतिक वनदिनी शासनाची भेट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

center for treatment of wild animals will be established in Jalgaon news

Jalgaon News : वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगावात होणार केंद्र; जागतिक वनदिनी शासनाची भेट!

जळगाव : जळगाव शहर व परिसरात वन्यजीवांवरील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

जळगावात ८ कोटी ८३ लाखांच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात येईल. (center for treatment of wild animals will be established in Jalgaon news)

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प होत असून, जागतिक वन दिनानिमित्त जिल्ह्यासाठी ही भेट मानली जात आहे.

मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रमाणापेक्षा जास्त केलेला हस्तक्षेप आता त्यांच्या जीवाला धोकादायक ठरताना दिसत आहे. यामुळेच अन्नाच्या शोधात हिंस्र वन्यप्राणी आपला आधिवास सोडून मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत. याचे गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे प्राण्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. त्यातून प्राणी जखमी होत असतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणा उपलब्ध नाही.

पालकमंत्री, आमदारांचा प्रस्ताव

पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगाव येथे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

एक हेक्टर क्षेत्रावर होणार उपचारकेंद्र

जळगाव वन विभागाने जळगाव शहरालगत असलेल्या लांडोरखोरी वनक्षेत्रात सुमारे १ हेक्टर क्षेत्रावर ८ कोटी ८३ लाख रुपये निधीतून ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव सादर केला.

त्यास मान्यता मिळाली आहे. वाढती लोकसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेल्या पद्धतीमुळे वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत असून, मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने अपघाताने जखमी होण्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी जखमी वन्य प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

असे असेल उपचार केंद्र

उपचार केंद्रात वन्यप्राण्यांना विहित कालावधीसाठी उपचारार्थ ठेवण्यात येणार असून, ते नागरिकांना प्रदर्शनासाठी खुले करता येणार नाही. वन्यप्राणी उपचार केंद्राचे पायाभूत सुविधा स्थापित केल्यानंतर सुयोग्य यंत्रणेमार्फत योग्य प्रणालीचा वापर करून उपचार केंद्राचे दैनंदिन प्रशासन व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ८ कोटी ८३ लक्ष निधीतून १ हेक्टर क्षेत्रावर वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonjungleanimal care