
Chandra Grahan 2022 : जळगावाला आज दिसणार खंडग्रास चंद्रगहण
जळगाव : मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पूर्व दिशेला खंडग्रास चंद्रग्रहण ही अदभुत खगोलीय घटना जळगावकरांना बघायला मिळणार आहे. (Chandra Grahan 2022 today Jalgaon News)
खरे बघितले, तर हे खग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र, याची सुरवात भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३२ मिनिटांनी उत्तर अमेरिकेतून होणार आहे. त्या वेळी आपल्याकडे चंद्रोदय होतो, तोपर्यंत ग्रहण सुटायला लागलेले असेल. त्यामुळे आपल्या भागात ते २५ टक्केच खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. गेल्या २५ ऑक्टोबरला झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणावेळी ग्रहण स्थितीतच सूर्यास्त झाला होता. या वेळी सायंकाळी पाच वाजून ४६ मिनिटांनी चंद्रोदय ग्रहण लागलेल्या स्थितीतच होणार आहे. पाच वाजून ५७ मिनिटांनी चंद्र २५ टक्के ग्रासलेल्या स्थितीत बघता येईल.
ग्रहण अनुभण्याचा उपक्रम
मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग व मराठी प्रतिष्ठानतर्फे मंगळराी सायंकाळी पाच वाजून ३० मिनिटांपासून मेहरूण तलाव परिसरात खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तीन टेलिस्कोप लावण्यात येणार आहेत. हा ऊन-सावल्यांचा खेळ असून, ग्रहण निसर्गाचा अदभुत चमत्कार आहे. तरी सर्वांनी मनात कोणतेही समज-गैरसमज न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.