जळगावात कोरोना लशीचा ‘ड्राय रन’ यशस्वी; शंभर जणांवर रंगीत तालीम 

देविदास वाणी
Friday, 8 January 2021

पाहिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली तर राकेश अरुण पाटील यांच्यावर दुसरी लसीकरणाची चाचणी करण्यात आली.

जळगाव ः : देशभरात कोरोनोने थैमान घातल्यानंतर या महामारीवर मात करण्यासाठी प्रतीक्षेत असलेली कोरोना लस येत असल्याने दिलासा मिळाला आहे. लस घेतल्यानंतरदेखील कोरोना निर्मूलनाच्या ‘त्रिसूत्री’चे पालन करायचे आहे. लवकरच आपण या महामारीवर विजय मिळवूया, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. 

आवश्यक वाचा- नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (रंगीत तालीम)आज सकाळी राबविण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी बोलत हेाते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते. 

सुरुवातीस पालकमंत्री पाटील यांना अधिकाऱ्यांनी ‘ड्राय रन’ साठी केलेली तयारी दाखवली. ऑनलाईन नोंदणी, लसीकरणाची तयारी, प्रतीक्षा कक्ष अशी उभारलेली यंत्रणा पाहिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली तर राकेश अरुण पाटील यांच्यावर दुसरी लसीकरणाची चाचणी करण्यात आली. यावेळी अधिपरिचारक संपत मल्हार यांनी त्यांची संगणकावर नोंद केल्यावर परिचारिका कुमुद जवंजाळ यांनी प्रातिनिधिक लस टोचली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. 

वाचा- नदीच्या पुलावर अचानक ट्रॉली उलटली; प्राण वाचले पण ? 
 

१५ दिवसात लस येणार 
आगामी १५ दिवसानंतर कोरोना लस येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काळे, पाटील यांचा पालकमंत्री पाटील यांनी सन्मान केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नर्सिंग कॉलेज इमारतीची रचना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. लसीकरणासाठी डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, अधिसेविका कविता नेतकर, परिचारिका जयश्री वानखेडे, कर्मचारी अनिल बागलाणे आदींनी सहकार्य केले. 

 

जिल्हयात कोरोना लशीचा ड्रायरन करण्यात आला तो यशस्वी झाला आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमानूसार ड्रायरन झाला. प्रत्यक्ष लसीकरणात काय अडचणी येवू शकतात याबाबतही आम्ही तपासणी केली. लस येताच अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. 

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine marathi news jalgaon corona vaccine dry run successful