अविश्वासाचा ठराव घ्यायला गेले आणि झाले उलटे; मग काय भाजपचे नगरसेवक पडले तोंडघशी ! 

आनंन शिंपी
Tuesday, 5 January 2021

सत्ताधाऱ्यांकडे दोनतृतीयांश बहुमत नव्हतेच, त्यामुळे हा प्रस्ताव पारित होणे शक्य नव्हते. उपनगराध्यक्षा चव्हाण यांनी चुकीच्या कामांना विरोध केला म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता.

 चाळीसगाव ः येथील उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यावर पालिकेतील सत्ताधारी भाजपसह २० नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव सोमवार (ता. ४)च्या सभेत भाजपकडे ठरावाच्या बाजूने पुरेसे संख्याबळ नसल्याने मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नगरसेवक तोंडघशी पडल्याचे दिसून आले. दरम्यान, पालिकेत घडलेल्या या नाट्यमय घडामोंडीमुळे लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे संख्याबळ वाढले असून, सत्ताधारी भाजप अल्प मतात आले आहे. 

येथील उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण या निवडून आल्यापासून कोणत्याही कामकाजात सहभाग नोंदवत नाहीत, वारंवार विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करतात. या कारणावरून त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी भाजपसह २० नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकराला सभा सुरू झाल्यानंतर तासाभराच्या गदारोळानंतर दुपारी तीनपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

या दरम्यान, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार घेऊन नगराध्यक्षा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दुपारी तीनला सभा सुरू झाली. या वेळी शहराचा विकास व्हावा, या उद्देशाने व आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता आम्ही उपनगराध्यक्षांवरील अविश्‍वासाचा ठराव सर्वानुमते मागे घेत आहोत, असे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सभागृहात सांगितले. उपनगराध्यक्षांवरील अविश्‍वास प्रस्ताव मागे घेतल्याने सभा संपल्याचे नगराध्यक्षा चव्हाण यांनी जाहीर केले. त्यावर हा ठरावच बेकायदेशीर असल्याने त्याची इतिवृत्तात नोंद करावी, अशी मागणी आघाडीच्या नगरसेवकांनी केली. भाजपने उपनगराध्यक्षांना पदावरून हटविण्याचा केलेला स्टंट व मीटिंगमध्ये झालेली चिटिंग याची चर्चा सभेनंतर सुरू होती. 

सभा बोलावलीच कशाला? 
पालिकेतील सभा आटोपल्यानंतर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्या दालनात गटनेते राजीव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधाऱ्यांकडे दोनतृतीयांश बहुमत नव्हतेच, त्यामुळे हा प्रस्ताव पारित होणे शक्य नव्हते. उपनगराध्यक्षा चव्हाण यांनी चुकीच्या कामांना विरोध केला म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता, असे राजीव देशमुख यांनी सांगितले. कोणतेही कामकाज हे नियमानुसार व्हावे, अशी आमची सुरवातीपासूनच मागणी आहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. पंचायत समितीतदेखील असा प्रयत्न भाजपने केला होता. उपनगराध्यक्षांवरील अविश्‍वास प्रस्ताव मागेच घ्यायचा होता तर ही सभा बोलावलीच कशाला, असा प्रश्‍नही श्री. देशमुख यांच्यासह आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. दरम्यान, आघाडीच्या ज्या नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल करतेवेळी सह्या केल्या आहेत त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

व्हीप आम्ही मागवला 
पालिकेत श्‍यामलाल कुमावत व विजया पवार हे दोनच शिवसेनेचे सदस्य आहेत. आजच्या सभेत अविश्‍वास प्रस्तावावर मतदान घेण्याची परिस्थिती लक्षात घेता, शिवसेना जिल्हाप्रमुखांनी ‘व्हीप’ बजावला होता. त्यावर बोलताना श्‍यामलाल कुमावत यांनी सांगितले, की हा ‘व्हीप’ आम्हीच स्वतःहून मागवला होता. आम्ही शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक महाविकास आघाडीसोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिकेच्या माध्यमातून विकासकामे करताना ती सर्वांनी मिळूनमिसळून करायची असतात. यापुढेही सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 
-संजय पाटील, गटनेते भाजप, पालिका 

पालिका सभागृहात यापुढे शहर विकास आघाडी, शिवसेना व अपक्ष एकत्र कामकाज करणार असून, आगामी निवडणूकही आम्ही सोबतच लढवू. 
-राजीव देशमुख, गटनेते, शहर विकास आघाडी  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporation marathi news chalisgaon bjp councilor deputy mayor no confidence motion