Jalgaon News : महापालिकेत नगरसेवकच वाहतायेत फायलींचा भार; मक्तदेारांचीही गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : महापालिकेत नगरसेवकच वाहतायेत फायलींचा भार; मक्तदेारांचीही गर्दी

जळगाव : प्रभागातील कामे लवकरच व्हावीत, यासाठी स्वत: नगरसेवकच फायलींचा भार वाहताना दिसत आहेत, तर शहर अभियंत्यांकडेही मक्तेदारांची गर्दी दिसून येत आहे. (corporators themselves are seen carrying loads of files so that works in ward are done soon jalgaon news)

नगरसेवकांची मुदत संपण्यास अवघे चार ते पाच महिने शिल्लक आहेत. या कालावधीत आपल्या प्रभागातील कामे लवकर व्हावीत, यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत. मध्यतंरी निधीमुळे अनेक प्रभागांतील कामे अडकली होती. आता निधीही प्राप्त झाला आहे.

त्यामुळे आपल्या प्रभागातील विविध कामे व्हावीत, यासाठीही त्यांचा खटटोप सुरू आहे. शिवाय महापालिकेत अनेक अधिकाऱ्यांच्या टेबलावरून फाईलच हालत नसल्यामुळे, तसेच आयुक्तांकडे ‘स्वाक्षरी’साठी विलंब लागत आहे.

यामुळे फाईलींचा प्रवास वेगाने व्हावा व कामाच्या निविदा काढून मक्तेदाराला कामाची ऑर्डर त्वरित मिळून काम सुरू व्हावेत, यासाठी काही नगरसेवकच फाईली स्वत: हातात घेऊन या मजल्यावरून त्या मजल्यावर धावपळ करीत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

प्रभागातील कामे पूर्ण झाल्यावर निवडणुकांना समोरे जाताना मतदारांना केलेल्या कामाचा पुरावा दाखविता येणार आहे. विशेषत: प्रभागातील रस्ते आणि गटारींची कामे पूर्ण करण्याकडे नगरसेवकांचा कल दिसून येत आहे.

आयुक्ताकडेही प्रतिक्षा

प्रभागातील कामांच्या फाईलवर त्वरित स्वाक्षरी व्हावी, यासाठी आयुक्तांच्या दालनाबाहेर नगरसेवक प्रतिक्षा करीत आहेत. आयुक्तांकडेही सध्या अधिकाऱ्यांच्या बैठका वर बैठका सुरू आहेत, तसेच काही नागरिकही भेटीस येत आहेत. त्यामुळे त्या व्यस्त आहेत. अशा स्थितीत आपल्या प्रभागाची फाईल त्वरित निघावी, यासाठी नगरसेवक दालनाबाहेर प्रतिक्षा करताना दिसत आहेत.

मक्तेदारांचीही गर्दी

महापालिकेत मक्तेदारांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. आपण केलेल्या कामांचे बिल त्वरित निघावे, यासाठीही त्यांची धावपळ सुरू आहे. शहर अभियंत्याच्या दालनात तर बिलावर स्वाक्षरीसाठी मक्तेदारांची गर्दी दिसून येत आहे.