कापूस खरेदी केंद्राची अखेर आशा मावळली !

राजू कवडीवाले
Friday, 25 December 2020

कापूस उत्पादक शेतकरी यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांकडून कापसास योग्य भाव मिळत नसल्याने आस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेले आहेत.

यावल : तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अपेक्षेप्रमाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा हेळसांड आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तांत्रिक कारणाअभावी ‘सीसीआय’ने साकळी येथील साई रामजी जिनर्सची निविदा रद्दबातल ठरविली आहे.

आवश्य वाचा-  कार शिकायला घेवून गेला, नियंत्रण सुटताच झाडावर जावून आदळला -
 

खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांतून तालुक्यात सीसीआयमार्फत प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी ‘सीसीआय’मार्फत निविदा निघाली होती. यासाठी साकळी येथील साई रामजी जिनर्स यांनी टेंडर भरले होते. दरम्यान, सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी बघेल यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रीतसर पाहणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणावरून साई रामजी जिनर्स यांची निविदा रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीसीआयने साई रामजी जिनर्स यांना अद्यापपावेतो या संदर्भात कळविलेले नाही. 

खासदार खडसेंनी केला पाठपुरावा

तालुक्यात सीसीआयमार्फत आठवडयातून एक दिवस प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला होता. 

 

कापसाला कावडीमोल भाव
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांकडून कापसास योग्य भाव मिळत नसल्याने आस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेले आहेत. शेतकऱ्यांना कोठेही आशेचा किरण दिसत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हताश बनलेला आहे. कापूस 'कवडीमोल' भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. काही खासगी व्यापारी याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे कापूस लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे. 

वाचा- काळा बाजारात जाणारा रेशनचा माल पकडला; पून्हा चोरीला गेला आणि पोलिसांनी पकडला  

शेतकरी संभ्रमात

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र, यावल तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. तालुक्याला दोन आमदार व एक खासदार लाभलेले असतानासुद्धा या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cottan marathi news farmar shopping center