Latest Marathi News | Whatsappवरील Fake Messageमुळे कापूस टंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp Fake Message

Jalgaon News : Whatsappवरील फेक मेसेज मुळे कापूस टंचाई

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढू लागल्याने कापसाला व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दरातही गेल्या १५ नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे. आठ ते साडेआठ हजारांऐवजी कापसाला नऊ हजार १०० रुपये दर मिळाला. हे दर आजही स्थिर आहेत. असे असले तरी अनेक ‘व्हॅट्‌सॲप ग्रुप’वर कापसाचे फेक मेसेज येत आहेत.

यात ‘कपाशीला ११ ते १५ हजारांचा दर मिळेल, अजून कापूस विकू नका’, ‘घरातच साठा करा’, यांचा समावेश आहे. यामुळे शेतकरी बाजारात कापूस विक्रीस आणत नसल्याने कापूसटंचाई निर्माण झाली आहे. सुरू असलेल्या जिनिंग अर्धवेळ चालविण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. (Cotton shortage due to fake messages on Whatsapp Jalgaon News)

कापसाचे दर नऊ हजारांपर्यंत गेल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्रीस आणतील, असे व्यापाऱ्यांसह कापूस अभ्यासंकाना वाटत होते. आतापर्यंत खरिपातील सुमारे ८० ते ९० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे.

मात्र, चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला नव्हता. मिळेल त्या दरात कापूस विकून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. किमान दहा हजारांचा दर मिळावा, यासाठी शेतकरी हव्या त्या प्रमाणात कापूस विक्रीस काढत नसल्याचे चित्र होते.

व्हॅट्‌सॲप ग्रुपवर ‘जळगावसह राज्यात कापूस दराबाबत ११ ते १५ हजारांचा दर मिळेल’ असे मेसेज फिरत आहेत. यामुळे शेतकरी कापूस विक्रीबाबत संभ्रमात आहेत. सध्या ८ हजार ५०० ते ९ हजारांचा दर सुरू आहे. तो दर अजून महिनाभर तरी तसाच राहील, असे बाजारातील चित्र आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खानदेशातील कापसाच्या गाठींना मागणी वाढली आहे. खंडीचा दर ६५ हजारांवरून ८५ हजारांपर्यंत गेला आहे. यामुळे ज्या जिनिंग चालकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून मागणी आली, त्यांनी ८ हजारांवरून ९ हजार दर कपाशीला देऊन गाठींची मागणी पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, व्हॅट्‌सॲपवरील फेक मेसेजमुळे अद्याप हवा तसा कापूस बाजारात विक्रीस येत नसल्याचे जिनिंग चालकांनी सांगितले.

कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध असताना, २५ हजार गाठींचा दररोज कापूस बाजारात येणे अपेक्षिषीत होते. मात्र, केवळ २५०० गाठींचा कापूस बाजारात येत आहे.

*जिल्ह्याची कापूस गाठी उत्पादन क्षमता : १८ ते २५ लाख गाठी

*मागील वर्षी उत्पादित गाठी : नऊ लाख

*मागील तवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर : नऊ ते १३ हजार

*सध्याचा दर : ८५०० ते ९ हजार