जळगाव : खत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गोलमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime fertilizer company officials scam jalgaon

जळगाव : खत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गोलमाल

जळगाव : कृषी खत कंपनीच्या जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने वितरकांशी संगनमत करून विनानोंदणीच्या कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करून कंपनीला एक कोटी ३० लाखांचा चुना लावला. शनिपेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील एका कंपनीत झोनल सेल्स मॅनेजर पदावर वैभव कमलकिशोर राठी कार्यरत आहे. कंपनीच्या ध्येयधोरणानुसार ही कंपनी केवळ नोंदणीकृत कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करते.

जिल्ह्यासाठी जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे मालक राधेश्याम सूरजमल व्यास व नितीन मदनलाल व्यास यांच्याशी (वर्ष २०११ ते २०१८ पर्यंत) करार करण्यात आला होता. मात्र, जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे नाव बदलून राधेश्याम सूरजमल व्यास या नावाने त्यांनी नवीन फर्म सुरू केली. असे असताना करारानुसार कंपनीकडून आलेला माल गुदामात (कानळदा रोडवर अव्हाणे गावाजवळील गुदामातून) साठवून त्याची विक्री सुरू होती.

ईपीओएस यंत्राने फुटली बोंब

कंपनीने योगेश जाधव यांच्याकडे जिल्ह्यात मालाची ऑर्डर घेण्याची जबाबदारी दिली होती. परंतु त्यांनी बालाजी फर्टिलायझर डांभुर्णी या वितरकाला पाठविलेला माल त्यांनी त्यांच्या कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परस्पर विक्री केल्याचे ईपीओएस मशिनद्वारे कंपनीला समजले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच योगेश जाधवने वितरित केलेला माल हा चेक स्वरूपात स्वीकारून बँकेची स्लीप भरून ते कंपनीकडे भरल्याची पावती त्याने कंपनीला सादर केली होती.

दोघांसह ट्रान्स्पोर्टसविरुद्ध गुन्हा दाखल

वर्ष २०१६ पासून आजपर्यंत राधेश्याम सूरजमल व्यास यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीसोबत ट्रान्स्पोर्टर म्हणून केलेला कराराच्या अटी-शर्तींचा भंग करून त्यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी पाठविलेला एक कोटी ३० लाख ७७ हजार ३६९ रुपयांचा खतांचा माल योगेश नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्यांना विक्री केला. तसेच योगेशने बनावट पोच पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी राधेश्याम सूरजमल व्यास, नितीन मदनलाल व्यास व योगेश नरेंद्र जाधव (तिघे रा. जळगाव) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑर्डर नोंदणीकृत केंद्राची अन्‌ माल...

जळगाव जिल्ह्यातील ऑर्डर घेऊन त्यांना माल वितरित करण्यासाठी कंपनीने योगेश नरेंद्र जाधव यांची नियुक्ती केली होती. जाधव हे कृषी केंद्रांकडून ऑर्डर घेऊन ती ऑर्डर कंपनीला पाठवीत होते. त्यानुसार कंपनी ही ऑर्डर राधेश्याम व्यास यांना पाठविल्यानंतर व्यास हा माल संबंधितांना पोचवीत होते. दरम्यान, कृषी केंद्रांना हा माल मिळाल्यानंतर ट्रान्स्पोर्टची पोचपावती कंपनीला पाठवीत होते. परंतु काही मालाच्या पावत्या व त्यावरील शिक्के हे बनावट असल्याचे कंपनीने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. तसेच २०१९ मध्ये कंपनीने विकलेल्या मालाचे पैसे मुदत उलटूनदेखील कंपनीला मिळाले नसल्याने संबंधितांकडून कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Crime Fertilizer Company Officials Scam Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top