जुगाराच्या अड्ड्यांवर सावकारांचा डोळा; तासांच्या बोलीवर व्याजाने कर्जपुरवठा 

चेतन चौधरी 
Thursday, 7 January 2021

जुगार अड्ड्यातील व्यसनाधीनांना शोधून त्यांची शिकार करण्यासाठी खासगी सावकारांकडून एजंटचाही वापर केला जाऊ लागला आहे.

वरणगाव (ता. भुसावळ) : शहरात अनेक दिवसांपासून व्यसनाधीन झालेल्या जुगाऱ्यांना निशाणा करून तासांच्या बोलीवर कर्ज देऊन खासगी सावकारांचा मालामाल होण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्लब व जुगाराच्या अड्ड्यांसह विविध ठिकाणी सावज शोधून शिकार करणारी सावकारी प्रवृत्ती आता डोके वर काढू लागली असून, पोलिसांनी अशा वृत्तींना वेसण घालण्याची गरज आहे. 

आवर्जून वाचा- चोपडा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; आजी-माजी नेत्यांच्या गावांत प्रतिष्ठा पणाला 

शहरात अनेक दिवसांपासून विविध प्रभागांत ५२ पत्त्यांतील रमी खेळ खेळण्याच्या नावाखाली व्यावसायिकांनी दहा ते १५ सदस्यांचा क्लब, असे शहरात सात ते आठ क्लब करून जुगार खेळविला जात आहे. यात आज नाही तर उद्या डाव लागेल, दिवस पालटतील, अशी अपेक्षा मनाशी बाळगून अनेक तरुणांना जुगारात अडकविले जात आहे. महिन्याच्या पगारासह घरातील शिल्लक असलेले पैसे, किमती वस्तूंपासून सर्व काही विकून जुगारी मोकळे होत आहेत. 

सावकारांचे एजंट 
जुगार अड्ड्यातील व्यसनाधीनांना शोधून त्यांची शिकार करण्यासाठी खासगी सावकारांकडून एजंटचाही वापर केला जाऊ लागला आहे. असे एजंट जुगार अड्ड्यांवर थांबून जुगार खेळणाऱ्याला दिवसासह तासांच्या बोलीवर व्याजाने कर्ज देऊन मनमानी वसुलीही करू लागले आहेत. 

जुगारअड्ड्यावरच कर्ज 
सावकार जुगार, मटका अड्ड्यांसह ज्या ठिकाणी जुगार चालतो त्या ठिकाणी ठाण मांडून बसू लागले आहेत. त्यांच्याकडून जुगार खेळणाऱ्याला गरजेनुसार दिवसाच्या किंवा तासांच्या बोलीवर १० ते ३० टक्के अशा मनमानी पद्धतीने व्याजाने जुगार खेळण्यासाठी कर्ज दिले जाते. ते कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश तारण म्हणून घेतात. 

 

आवर्जून वाचा- पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’मानांकनाचा प्रस्ताव

 

वसुलीसाठी तारण 
एखाद जुगारी पैसे हरला, तर त्याला कर्ज देऊन खेळण्यास भाग पाडले जाते. जिंकला तर त्याच्याकडून व्याजासह जागेवर वसुली केली जाते; पण कर्जदार जुगारात हरला तर तारण घेतलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची वसुली सुरू होते. 

कुटुंबे अडचणीत 
जुगारात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या एका चुकीचा फटका त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसत आहे. दिलेल्या भक्कम अशा तारणामुळे घरची मंडळीही हैराण आहेत. या सावकारांविरोधात कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांना चांगलेच फावत आहे. 

अघोरी प्रवृत्ती ठेचून काढा 
शहरातील अवैध व्यवसायांबाबत मध्यंतरी पोलिस आक्रमक झाले होते. मात्र त्याच पद्धतीने शांतही झाले. जुगार क्लब किंवा अड्ड्यावर अंकुश बसणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. छुप्या पद्धतीने सुरू असणारे क्लब व जुगारांचे अड्डे बिनधास्त समोर सुरू आहेत. पोलिसांनी जुगार अड्डे शोधून तेथील खासगी सावकारीची अघोरी प्रवृत्ती वेळीच मोडून काढण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. 

हेही वाचा- बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरूंगाची हवा; जाणून घ्या 'हे' महत्वाचे नियम

पडद्यामागची सावकारी 
घरातील किमती सामान विकायचे, पण जुगार खेळायचाच, अशी जुगारींची मानसिकता बनते. जुगारात बुडालेली व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत अड्ड्यावर पडून असते. त्याला जुगाराचा डाव पुढे खेळण्यासाठी दिवसाच्या अगर काही तासांच्या मुदतीसाठी पैशांची गरज भासते. त्याच्या याच गरजेचा फायदा उचलून खासगी सावकार गल्लेठ्ठ बनू पाहत आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news bhusawal gambling den lender loan deception youth