सलग अकरा दिवस केला तपास; मग खाद्यतेल चोरणारी टोळी लागली हाती 

रईस शेख
Monday, 4 January 2021

ट्रकमध्ये सात लाख ३७ हजार ३४५ रुपयांचे खाद्यतेल चोरट्यांनी लंपास केले होते. वरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

जळगाव ः वरणगाव (ता. भुसावळ) येथे राष्ट्रीय महामार्गाशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधून सात लाख ३७ हजार ३४५ रुपयांचे खाद्यतेल चोरीला गेले होते. वरणगाव पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्ह्यात गेल्या अकरा दिवसांपासून सलग तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयितांना अटक करून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आवश्य वाचा- वाळू मिळत नाही म्हणून बोदवड उपसा, दीपनगर प्रकल्प रखडण्याची शक्यता 
 

जळगावकडे खाद्यतेल घेउन निघालेला ट्रक (एमएच १९, सीवाय ६००२) वरील चालकाने २३ डिसेंबरला वरणगाव येथे महामागार्गाच्या शेजारी ढाब्यावर ट्रक उभा केला होता. ट्रकमध्ये सात लाख ३७ हजार ३४५ रुपयांचे खाद्यतेल चोरट्यांनी लंपास केले होते. वरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली होती.

अशी सुरू झाला शोध 

त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, राजेंद्र पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील यांच्या पथाकाने बातमीदाराच्या माहितीच्या आधारे गुजरात गाठले, आठ दिवस गोध्रा (गुजरात) येथे मुक्कामी राहून पथकाने इद्रीस मोहम्मद कालू (वय ३८), मोहम्मद बशीर शेख (वय ३५), शोएब हुसेन जभा (वय ३७, तिघे रा. गोध्रा, गुजरात) यांना ताब्यात घेतले. तिघांकडून संपूर्ण मालाची रिकव्हरी करून पोलिस पथक जळगावी परतले असून, तिघा भामट्यांना वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon police arest oil theft gang