अट्टल गुन्हेगारांनी तरुणांना हेरले; गँग तयार करून गंभीर गुन्हे घडविण्याचा होता प्लॅन  

रईस शेख
Friday, 25 December 2020

शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या टोळ्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. शिक्षण घेणाऱ्या तरुणांना नादी लावून त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणले जात होते.

जळगाव ः शहराच्या विविध परिसरात कट्टर विचारांच्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. आजवर केवळ कुणालातरी हाणामाऱ्या करून पळणाऱ्या या गुन्हेगारांनी आता थेट चोऱ्या, घरफोड्या आणि वाहन चोरीत जम बसविल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. सम्राट कॉलनी, लक्ष्मीनगर परिसरातील टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन महिन्यांच्या अभ्यासाअंती अटक केली. महाविद्यालयीन तरुणांना व्यसनांसह महिलांच्या नादी लावून त्यांच्याकडून चोऱ्या, घरफोड्या, जबरी लुटीसह गंभीर गुन्हे घडविले जात आहेत. 

जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीसह चोऱ्या-घरफोड्या आणि टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी जिल्‍हा पोलिस दलाने कंबर कसली आहे. शहरातील १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांना सुरवातीला भाईगिरीचे आभासी विश्व दाखवत जाळ्यात ओढायचे आणि नंतर पैशांची चटक, बिअर-दारूसह, वेश्यालयात नेऊन मौजमजा घडवून आणत या तरुणांच्या टोळ्यांकडून घरफोड्या, चोऱ्या, जबरी लुटीसह गंभीर गुन्हे घडवून आणणाऱ्या आकाश सोनार (वय ३०, रा. लक्ष्मीनगर) या भामट्याला गुन्हे शोखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसी मेजवानी झाल्यानंतर आकाशने त्याच्याजवळील गावठी पिस्तूल, सहा राउंड गोळ्या, एक एअरगन, कोयता, तलवार अशा शस्त्रांसह आकाश सोनार, भोजराज पवार, अविनाश राठोड, गणेश सोनार या चौघांना ताब्यात घेण्यात आले. 

गोळीबार केला अन्‌ बेड्या पडल्या 
शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या टोळ्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. शिक्षण घेणाऱ्या तरुणांना नादी लावून त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणले जात असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, पंकज शिंदे, राजेश मेंढे, रवींद्र नरवाडे, अविनाश देवरे, भगवान पाटील यांच्या पथकाने सम्राट कॉलनीतील तरुणांवर लक्ष केंद्रित केले होते. किरकोळ गुन्हे, हाणामाऱ्यांची माहिती वेळोवेळी समोर येत असताना, पोलिस पथकाला वाहनचोऱ्या आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा संशय बळावला, अशातच आकाश सोनार याने नुकताच (ता. १८) सम्राट कॉलनीत भरचौकात गोळीबार केला आणि पोलिस पथकाने एकामागून एक अशा चौघांना ताब्यात घेत अटक केली. 

या गुन्ह्यांची कबुली 
लाठी शाळेतील चार संगणकांसह चार प्रिंटर खोलीचे दार तोडून चोरून नेले होते, भोजराज व अविनाश यांनी गुन्ह्याची कबुली दिली, खुबचंद साहित्यानगरातून चोरून आणलेल्या पल्सरसहित इतर मोटारसायकली, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या व इतर साहित्य चोरून नेल्याची कबुली ताब्यातील संशयितांनी पोलिस चौकशीत दिली. 

कट्टर टोळ्यांशी संलग्न 
अटकेतील आकाश भाई हा असोदा रोड परिसरातील विशिष्ट कट्टर टोळ्यांच्या संपर्कात असून, पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी बोलावल्यावर पैलवान ग्रुपसह दोन-तीन ग्रुपच्या म्होरक्यांनी पोलिसांना आपसात निपटून घेण्यासाठी विनवण्या केल्याचेही चौकशी करणाऱ्या पथकाने माहिती देताना सांगितले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon police arrested criminal