वाळूचोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग;  आठ ट्रॅक्टर जप्त

सचिन जोशी
Friday, 29 January 2021

विनानंबर ट्रॅक्टरचालकाने मोहाडी शिवारातील जिल्‍हापरीषद शाळेजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॉली आडवी करून ट्रॅक्टर घेवून पळून गेला. 

जळगाव ः जिल्ह्यातील आठ वाळूगटांचे लिलाव नुकतेच झाले असून गट मक्तेदाराच्या ताब्यात मिळालेले नाहीत. तरीही, वाळूमाफियांनी चोरटी वाहतूक वाढवली आहे. गिरणा नदिपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन सहाय्यक पोलिस अधीक्षक व उपधीक्षकांच्या पथकाने विविध तीन ठिकाणी कारवाई करत वाहने जप्त केली. 
 

आवश्य वाचा- ग.स.चे अध्यक्ष पाटील संचालकपदासाठी अपात्र 
 

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा व परिविक्षाधीन उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या पथकाने जळगाव तालुक्यातील मोहाडी, सावखेडा व अन्य ठिकाणी छापेमारी केल्यावर आठ वाळू वाहने जप्त केली. 

सिनेस्टाइल पाठलाग 
पोलिस पाठलाग करत असताना एका ट्रॅक्टरचालकाने वाळूने भरलेली ट्रॉलीच रस्त्यावर आडवी करून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला रामानंदनगर आणि एमआयडीसी पेलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या पथकाने केली कारवाई 
गुप्त माहितीच्या आधारे आज सकाळी राखीव पोलिस कर्मचाऱ्यांच्या संदीप बिऱ्हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल कर्डेकर, रवींद्र मोतिराया, प्रकाश मुंडे, प्रशांत साखरे अशांच्या पथकाने छापेमारी करुन आठ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. मोहाडी रोडवरील चार ट्रॅक्टर प्रकरणी गोविंदा विश्राम पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक जितेंद्र राठोड करत आहेत. 

आवर्जून वाचा- अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने उपाययोजना करा : खासदार रक्षा खडसे
 

ट्रॉली सोडून ट्रॅक्टर पसार 
डीवायएसपींचे पोलिस पथक ट्रॅक्टरचा सिनेस्टाईल पिच्छा पुरवत असताना विनानंबर ट्रॅक्टरचालकाने मोहाडी शिवारातील जिल्‍हापरीषद शाळेजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॉली आडवी करून ट्रॅक्टर (धुळ) घेवून पोबारा केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पोलिस या ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे. शिरसोली नाक्या जवळी मच्छीवाले सपकाळे यांच्या मुलाचा तो, ट्रॅक्टर असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरु होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon police seize eight tractors pursuit illegal sand thieves