
दुर्धर आजाराचा रुग्ण आहे... लवकर अंत्यसंस्कार करावे लागतील, अशी घाई करून मृतदेह मेहरुण स्मशानात नेण्यात आला होता.
जळगाव ः शहरातील मेहरुण येथील रहिवासी योगेश अत्तरदे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी थेट मृतदेह स्मशानात अंत्यसस्कारासाठी नेला. अंत्यदर्शनाचा हट्ट पत्नीच्या माहेरच्यांनी केल्यावर तोंड दाखविण्यात आले; मात्र गळ्यावर फाशीचा व्रण आढळून आल्याने अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला गेला.
मेहरुण येथील रहिवासी योगेश वसंत अत्तरदे (वय ४०) यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. परिणामी, ते काही महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेले होते. साधारण दहा दिवसांपूर्वीच ते घरी परतले. जिल् हारुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना पाच दिवसांपूर्वीच त्यांना डीस्चार्ज देण्यात आला होता. योगेश अत्तरदे यांना घरी सोडून पत्नी सपना अत्तरदे या नशिराबाद येथे माहेरी असताना आज सायंकाळी त्यांना योगेश यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली.
अंत्यसंस्काराची नातेवाईंकाची घाई
तसेच त्यांनी जळगावी धाव घेतली. संध्याकाळची वेळ असल्याने तोपर्यंत चुलत्या नातेवाइकांनी मृतदेहाची अंघोळसुद्धा न घालता अत्यंस्काराची तयारी पूर्ण केली होती. दुर्धर आजाराचा रुग्ण आहे... लवकर अंत्यसंस्कार करावे लागतील, अशी घाई करून मृतदेह मेहरुण स्मशानात नेण्यात आला होता.
निनावी फोन आला...
अग्निडागापूर्वीच सरण रचून तयार असताना योगेश अत्तरदे यांना अग्निडाग देणार इतक्यात नातेवाइकांपैकी एकाला गुप्त बातमीदाराने फोन करून फाशीचा विषय कळवला. परिणामी, त्या नातेवाइकाने अंत्यसंस्कार थांबवून दर्शनाचा हट्ट धरला.
अंत्यदर्शन घेताना समोर आले भलतेच
मृतदेहाचे दर्शन घेताना गळ्यावर फाशीचे व्रण आढळून आल्याने स्मशानात एकच गोंधळ उडाला. एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन रात्री मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने पोलिस प्रकरण हाताळत होते. सकाळीच मृतदेहावर विच्छेदन होणार असून, नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे