
पूर्ववैमनस्यातून दोघेही मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. दोघांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस प्राप्त करून काही तरी होणार यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली.
जळगाव : शहरात आकाशवाणी चौकात नाश्ताच्या गाडीवर काम करणारा तरुण व त्याच्या मित्राला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पवन ऊर्फ राहुल बनबेरू याच्याकडे काडतूस असल्याच्या माहितीवरून त्याला ताब्यात घेतल्यावर त्याचा मित्र कार्तिक सुरवाडे याला पिस्तूलसह ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रायसोनीनगरातील पवन ऊर्फ राहुल बनबेरू (वय ३०, रा. रायसोनीनगर) या तरुणाने जिवंत काडतूस खरेदी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील विजय पाटील, भगवान पाटील, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाला मिळाली होती.
अशी केली कारवाई
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आकाशवाणी चौकातच सापळा रचून पवन ऊर्फ राहुल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात नऊ एमएम जिवंत काडतूस मिळून आले. त्याने पिस्तुलीचा ठिकाणेही सांगितले. परंतू पिस्तूल त्याचा मित्र कार्तिक सुरवाडे (वय १९) याच्याकडे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला मानराज पार्क येथून ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. दोघांना अटक करून जिल्हापेठ पोलिसांत बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुश्मनी काढण्यासाठी मोठा गुन्हा करण्याच्या बेतात
कार्तिक सुरवाडे आणि पवन ऊर्फ राहुल बनबेरू अशा दोघांची घट्ट मैत्री आहे. कार्तिक आकाशवाणी चौकात नाश्ताची गाडी चालवतो. पूर्ववैमनस्यातून दोघेही मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. दोघांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस प्राप्त करून काही तरी होणार यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली.
संपादन- भूषण श्रीखंडे