ये जेल है भाई... यहाँ सबकुछ चलता है... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prisoner attacks police in jail mobile jalgaon

ये जेल है भाई... यहाँ सबकुछ चलता है...

जळगाव : कारागृहाच्या बॅरेकमध्ये अंगझडती घेण्यास विरोध करून कैद्याने कारागृह पोलिसाला शिवीगाळ करत शस्त्राने हल्ला चढवला. मात्र, चुकीची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वत:वरही वार करून घेतल्याची घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी उघडकीला आली. हे प्रकरण शांत होत नाही, तोवर दुसऱ्या घटनेत एका कैद्याला जेलच्या भिंतीवरून कोणीतरी मोबाईल फेकल्याचे आढळून आले. दोन्ही प्रकरणांत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्‍हापेठ पोलिसांत दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्हा कारागृहात पोलिस शिपाई राम घोडके सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे असे कारागृह अधीक्षकांच्या सूचनेवरून बुधवारी सायंकाळी सहाला बॅरेकमध्ये जाऊन प्रत्येक कैद्यांची अंगझडती घेत होते. बॅरेकमध्ये शिरून कैद्यांची झडती घेताना न्यायबंदी सचिन दशरथ सैंदाणे याने अंगझडती देण्यास नकार देत वाद घातला. मात्र, पोलिसांनी सर्वांची झडती घेतल्याने त्याच्या अंगझडतीच्या वेळेस सचिन सैंदाणे याने विरोध करत गोंधळ घातला. जेल पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी केली.

लोखंडी पात्याचे शस्त्र

सचिन याने स्वतः जवळ लपवून ठेवलेल्या चाकूसारखा लोखंडी पाते असलेल्या शस्त्राने घोडके याच्यावर हल्ला चढवला. वेळीच इतर कर्मचाऱ्यांनी सावध केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, नंतर आपल्याला मार बसेल या भीतीने संशयिताने स्वतःवर वार करून घेत जखमी केले. घटना कळताच सर्कल जेलर एस. पी. पवार यांनी बॅरेक गाठून माहिती घेतली. जखमीवर उपचार करण्यात आले असून पोलिस राम घोडके यांच्या तक्रारीवरून सचिन सैंदाणे या न्यायबंदीविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायबंदी सचिन सैंदाणे हा २५ सप्टेंबर २०१६ साली प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक होऊन कारागृहात आला आहे. या घटनेमुळे इतरही कैद्यांची हिंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेलच्या भिंती ओलांडून मोबाईल कैद्याच्या हाती

जळगाव : जिल्हा कारागृहाच्या बाहेरून ठराविक ठिकाणाहून कैद्यांसाठी मोबाईल फेकण्यात येतात. संबंधित कैदी ठरल्यावेळेस जाऊन तो मोबाईल उचलतो. असाच प्रकार बुधवारी घडला. मात्र, मोबाईल उचलताना जेल पोलिसांनी बघितल्याने संशयित पकडला गेला असून जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा कारागृहाच्या पाठी मागील भिंतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवारी (ता. २३) सायंकाळी ५ ते ५.४५ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कोविड बँरेक व १२ नंबर बँरेकमधील मोकळ्या भागात मोबाईल फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन बंदीवान प्रशांत अशोक वाघ याने उचलला. प्रशांत यांच्याकडे मोबाईल आढळून आल्याने जेल पोलिस कर्मचाऱ्यांनी मोबाईल हस्तगत केला आहे. प्रशांत वाघ हा १८ नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणाऱ्या चार दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर आहे. जेल शिपाई बुढन भिकन तडवी (वय ३७) यांच्या फिर्यादीवरून कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जयंत कुमावत करीत आहे.

Web Title: Crime Prisoner Attacks Police Jalgaon District Jail Mobile Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top