Jalgaon Cyber Fraud : क्राईम एसपींचे फेसबुक अकाउंटही नाही सुरक्षित...! होतेय पैशांची मागणी | cyber fraud Demand for money in favor of Upper Superintendent of Police jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Upper Superintendent of Police Chandrakant Gavali

Jalgaon Cyber Fraud : क्राईम एसपींचे फेसबुक अकाउंटही नाही सुरक्षित...! होतेय पैशांची मागणी

Jalgaon Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांनी चक्क अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यावर फेसबुकवर बनावट खाते तयार करून परिचितांनाकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

याबाबत सायबर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (cyber fraud Demand for money in favor of Upper Superintendent of Police jalgaon crime news)

जळगाव शहरात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून बनावट खाते तयार करून गंडविण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. एका सायबर गुन्हेगाराने चक्क अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांचे फोटो डाऊनलोड करून फेसबुकवर त्यांच्या नावे बनावट खाते तयार केले.

त्यांच्या परिचितांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ॲड केले व पैशांची मागणी केली. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (वय ३६, रा. नवीन पोलिस कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

२८ मार्चपासून आजपावेतो कोणी तरी अनोळखी व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून सायबर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रतिसाद देऊ नये

फेसबुक अकाउंटद्वारे पैशांची मागणी करण्यात येत असून, अशा फेक अकाउंटवरून आलेल्या रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नये. त्या सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून, सायबर पोलिस त्याला अटक करतील, असे आवाहन अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

यापूर्वीही अशा घटना

यापूर्वी अप्पर अधीक्षक मोक्षदा पाटील, चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांचे नाव व फोटोचा वापर करून पैशांची मागणी करण्यात आली आहे. नेटकरांनी अशा मागण्यांना प्रतिसाद देऊ नये, असे सायबर पोलिस ठाण्यातर्फे सांगण्यात आले.