Jalgaon Destination Wedding Trend : जिल्ह्यात ‘डेस्टिनेशन वेडिंग’चं भारीच आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Destination Wedding

Jalgaon Destination Wedding Trend : जिल्ह्यात ‘डेस्टिनेशन वेडिंग’चं भारीच आकर्षण

जळगाव : लग्न आयुष्यात एकदाच होते. यामुळे पालक आपल्या उपवर मुला-मुलींच्या आवडीनिवडीप्रमाणे लग्न लावून देताना दिसतात. बदल्यात काळानुसार पंचतारांकित हॉटेल्स, वातानुकूलित हॉल, मंगल कार्यालयात विवाह समारंभ केला जातो. आता आपल्या जिल्ह्याशिवाय इतर प्रेक्षणीय ठिकाणी (डेस्टिनेशन वेडिंग) विवाह करण्याकडे कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे २० ते ३० ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाली आहेत. (Destination Wedding trend very popular in Jalgaon district news)

लग्नसोहळा म्हणजे हौस, मौज, मान, वस्तू देणे-घेणे आले. लग्नसोहळा मोठा, दिमाखदार झाला पाहिजे, उत्तम जेवण, सुविधा मिळाल्या पाहिजेत असा कल आहे. मग तिथे पैशांचा विचार केला जात नाही. आजकाल धावपळीच्या युगात लग्न ठरविणे, लग्नासाठी हॉल, आचारी, पुजारी ठरविणे, वाजंत्री, घोडा, बग्गी, वधू-वरांसह घरातील इतरांचे कपडे, दागदागिने खरेदी आली. अशा अनेक कामांसाठी धावपळ वधूपक्षाला करावी लागते.

जग जसजसे आधुनिकतेकडे वळते आहे तसा लग्नाबाबतचा कलही बदलू लागला आहे. पूर्वी घरासमोर मंडप टाकून लग्न करण्याची परंपरा होती. लग्न असलेल्या घरी किमान महिनाभर अगोदरपासून पाहुण्यांची वर्दळ असायची. त्यांची राहण्याची, जेवणाची सोय लग्नाच्या घरी होत असे. प्रत्येक जण झेपेल अशी लग्नकार्यात कामे करीत असे. मात्र आता काळ बदलत गेला तसे लग्नाचे स्वरूपही बदलत चालले आहे.

लग्नासाठी घरासमोर जागेऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये लग्ने होऊ लागली आहेत. काही जण पंचतारांकित हॉटेलमध्येही लग्नसमारंभ करीत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग फोटोशूट संकल्पना रुजू झाली आहे. त्यात किमान दोन लाखांपासून तर दहा लाखांपर्यंतचा खर्च प्री-वेडिंग फोटोशूटला येतो. त्याबरोबरच बदलत्या काळानुसार नागरिक डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत.

हेही वाचा: Achievement : दार्जिलिंगमधील खडतर गिर्यारोहण प्रशिक्षण आनंद बांगरने केले पूर्ण

आपल्या परिसरातील मंगल कार्यालय फुल असली किंवा एका निवांत स्थळी शंभरदोनशे पाहुण्यांना घेऊन जाता येईल अशी डेस्टिनेशन स्थळे पाहून त्या ठिकाणी लग्ने उरकली जात आहेत. त्यात एखाद्या इव्हेंट कंपनीला डेस्टिनेशन वेडिंगची ऑर्डर देऊन हळदीपासून तर बिदाईपर्यंतची कामे देऊन खर्च दिला जात आहे. केवळ आपण वधू-वर व पाहुणे मंडळींना इच्छित स्थळी घेऊन जायचे आहे. लग्नातील सर्व बाबींची जबाबदारी संबंधित इव्हेंट कंपनी सांभाळते.

पसंतीची स्थळे

जळगाव जिल्ह्यात काही प्रेक्षणीय स्थळे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्धीस येत आहेत. त्यात श्रीक्षेत्र तरसोद, कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिर, श्री पद्मालय मंदिर, पाटणादेवी, मनुदेवी यासोबतच जरा लांबच्या अंतरावर गेल्यास सापुतारा, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना पसंती असल्याचे सांगण्यात आले.

"डेस्टिनेशन वेडिंगचा कल गेल्या दोन वर्षांपासून वाढला आहे. मोजक्या दीडशे ते दोनशे पाहुण्यांना घेऊन एखाद्या स्थळी जाऊन लग्न लावता येते. त्यासाठीचा खर्च दोन लाखांपासून आपल्या सुविधांनुसार ठरत असतो. दोन वर्षांत २५ ते ३० डेस्टिनेशन वेडिंग झाली आहेत."

-दिनेश थोरात, संचालक, एस. डी. इव्हेंट

हेही वाचा: Tourism Trends of Nashikkar : राज्यात कोकण, देशात केरळ, तर परदेशात सिंगापूर