esakal | Jalgaon | करवसुली आकड्यांमध्‍ये गोलमाल
sakal

बोलून बातमी शोधा

 जि. प.

जळगाव : करवसुली आकड्यांमध्‍ये गोलमाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ग्रामपंचायतींकडून करवसुली केली जाते. वार्षिक अहवालात याची ८० टक्‍के वसुली दाखविण्यात आली आहे. असे असेल तर ग्रामपंचायतींकडून जिल्‍हा परिषदेचे ३० कोटी रुपये घेणे असताना रक्‍कम जमा का केली जात नाही. अर्थात, वार्षिक अहवालात दाखविलेली वसुलीची आकडेवारी खोटी दाखवून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यावरून सभागृहात ठेवण्यात आलेला वार्षिक अहवाल नामंजूर करण्यात आला.

जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १४) अध्‍यक्षा रंजना पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. सभेला मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्‍यक्ष लालचंद पाटील, सभापती ज्‍योती पाटील, जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, उज्ज्‍वला माळके, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे उपस्थित होते.

हेही वाचा: जळगावः कोरोनाचा धोका अद्यापही कायम..आठवडाभरात दुसरा मृत्यू

बीडीओंना वसुलीचे टार्गेट द्यावे

करवसुलीचा मुद्दा शिवसेनेचे नाना महाजन यांनी सभागृहात मांडला. यात जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींची वसुली ८० टक्‍के असल्‍याचे वार्षिक अहवालात दाखविले आहे. या आकडेवारीनुसार जनता कर भरत असेल, तर ५५० ग्रामपंचायतींचे कनेक्‍शन कट का झाले? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. तसेच वसुली झाली असेल, तर ती रक्‍कम जिल्‍हा परिषदेकडे भरली का नाही? अर्थात, सभागृहाची दिशाभूल करत अधिकारीच अधिकाऱ्याला वाचविण्याचे काम करत असल्‍याचा आरोप नाना महाजन यांनी केला. यासाठी चौकशी होऊन बीडीओंना टार्गेट देण्यात यावे, अशी मागणी त्‍यांनी केली.

शिखर समिती स्‍थापन व्‍हावी

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या पाणीपट्टी वसुलीसाठी शिखर समिती स्‍थापनेबाबतचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. यात कासोदा येथे शिखर समिती स्‍थापन करण्यात आली, तर जिल्‍ह्यात अन्‍य ठिकाणी समिती का नाही? असा प्रश्‍न मांडण्यात आला. या विषयावरून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यामुळे सर्वच योजनांवरील पाणीपट्टी वसुलीसाठी शिखर समिती स्‍थापन व्‍हावी; अशी मागणी करत सदर विषय नामंजूर करण्यात आला.

शेतकरी मदतीवरून गदारोळ

अतिवृष्‍टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाला मदत म्‍हणून राज्‍य सरकारने मदत जाहीर केली आहे. याबाबत नाना महाजन यांनी शासनाचा अभिनंदन ठराव मांडला. यावर भाजपचे पोपट भोळे यांनी आक्षेप मांडत शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असल्‍याचे म्‍हटले. अतिवृष्‍टीमुळे जमिनी खरडून गेल्‍या आहेत. त्‍याचा मोबदला शेतकऱ्याला मिळावा; अशी मागणी पोपट भोळे यांनी केली. मात्र महाविकास आघाडीचे चांगले काम असून, शेतकऱ्यांच्या विषयात राजकारण नको, असे शिवसेनेचे रावसाहेब पाटील यांनी सत्ताधारी भाजपला उद्देशून म्‍हटले.

loading image
go to top