
खबरदार! रात्री दहानंतर डीजे वाजवाल तर... पोलिसांचा कारवाईचा इशारा
पारोळा (जि. जळगाव) : लग्नसराई म्हटली, की डीजे, बेंजो, बँड पथक यांची आधी आठवण होते, परंतु आता न्यायालयाच्या आदेशानुसार ही वाद्ये आता फक्त दहापर्यंत वाजविण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वेळेचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
शहरासह परिसरातील डीजे, बेंजो, बँड मालक, चालक यांची पारोळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात पोलिस निरीक्षक वाकोडे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून रात्री दहानंतर कोणतेही वाद्य वाजविण्यास बंदी आहे. तसेच डीजे, बेंजो, बँड पथकांच्या वाहनांमध्ये आरटीओची परवानगी घेऊनच बदल करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नियम मोडणाऱ्यांना नोटीस देण्यात येईल, असा इशारा पोलिस विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या लग्नसराई शेवटच्या टप्प्यावर आली असताना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झाल्यामुळे युवकांचा हिरमोड झाला असून, रात्री अकरापर्यंत तरी डीजे वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी अपेक्षा युवकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची लांबविली दुचाकी!
दरम्यान, ‘डीजे’धारकांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. बदलत्या काळानुसार लाखो रुपये खर्च करून डीजेचा लुक बदलविण्यात येतो.
आम्ही घेतलेल्या ऑर्डर हजारो रुपयांच्या असतात. जर कोणत्या ग्राहकाने आम्हास आग्रह करून जास्त वेळ वाजवायला लावल्यास आम्हास त्याच्या आग्रहास मान द्यावा लागतो. कोरोना काळामुळे पहिलेच खूप नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात न्यायालयाच्या नियमानुसार वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. यासाठी लग्न व इतर सोहळे धारकांनी आम्हा डीजे चालकांना सहकार्य करावे, असे डीजेधारकांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा: फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटींचा दंड वसूल : रेल्वेची विशेष मोहीम
Web Title: Dj Plays After 10 Pm Police Will Take Action Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..