Jalgaon News : जळगावकरांना किफायतशीर किमतीत घरे; बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Easier construction permit process on small plots by municipal corporation jalgaon news

Jalgaon News : जळगावकरांना किफायतशीर किमतीत घरे; बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ

जळगाव : स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, आर्थिक नियोजनाअभावी अनेक जणांची ती इच्छा पूर्ण होत नाही. (Easier construction permit process on small plots by municipal corporation jalgaon news)

मात्र, महापालिकेने छोट्या भूखंडावरील (Small Plots) बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुलभ केली असून, गृहप्रकल्पांना चालना मिळून नागरिकांना किफायतशीर किमतीत स्वत:ची हक्काची घरे उपलब्ध होतील व त्या माध्यमातून महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याचे ध्येय महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ठेवले आहे.

महापालिकेच्या सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी जनतेला कोणतीही करवाढ न करता विकास करण्याचा दिलासा दिला आहे. उत्पन्न वाढीसाठी घरपट्टीसोबतच महापालिकच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्याच्या भाडेतत्वाचा दहा- १२ वर्षांपासून प्रलंबीत विषय मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

२४ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन

आगामी वर्षात अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटारी योजनेंतर्गत अपूर्ण असलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या योजनाचे कार्यान्वयन करणे, अमृत २.० योजनेच्या उर्वरित भागांचे तसेच २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याचा मानसही केला आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणार

केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेंतर्गत ४९ कोटी रुपयांचा सुधारित घनकचरा प्रकल्प मंजूर झाला आहे. आव्हाणे शिवारातील कचरा डेपोवरील पूर्वीच्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया पूर्ण करून कचरामुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, तेथे प्रक्रियेअभावी कचरा साठला आहे. उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण करून जागा मोकळी झाल्यानंतर त्याच जागेवर नव्याने येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा मानस ठेवला आहे.

सौरऊर्जेवरील टायमर सिग्नल

शहरातील चौकांत उभारलेले जुने वाहतूक नियंत्रक व्यवस्था पूर्ण निष्काषीत करून त्या जागी आता सौरऊर्जेवरील नवीन तांत्रिक प्रणालीचे टायमरसह स्वयंचलीत वाहतूक नियंत्रक व्यवस्थेचे दिवे बसविण्यात येतील. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मलनिस्सारण जोडणी, मात्र मलप्रवाह कर

आगामी आर्थिक वर्षात महपाालिकेतर्फे मलप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक घराचे शौचालय व सांडपाणी कनेक्शन योजनेला जोडण्यात येईल. ही योजना सुरू झाल्यावर जोडणी शुल्क, तसेच मलप्रवाह कर लागू करण्यात येईल.

महिला मेळावे, दिव्यांग निधी

अंदाजपत्रकात महिला व बालकल्याण विभागासाठी २ कोटी रुपयांची तरतूद असून, या विभागातर्फे शिक्षिका, मदतनिस यांना मानधन, विद्यार्थ्यांना पोषण आहार, शिष्यवृत्ती, पुस्तकेवाटप, तसेच महिलांची वैद्यकीय तपासणी, तसेच विविध विषयांचे प्रशिक्षण देणे, महिला बचत गटांसाठी मेळावे घेण्यात येतील, तसेच दिव्यांगाच्या कल्याणासाठी २ कोटींची तरतूद केली आहे. आर्थिक व दुर्बल घटकातील नागरिकांसाठी स्वतंत्रपणे दोन कोटींची तरतूद केली आहे.

नवीन रस्ते, गटारींसाठी निधी

शहरात नवीन रस्ते व गटारींसाठी नियोजन केले आहे. यात नवीन गटारींसाठी ३५ कोटी, नवीन शौचालय, स्वच्छतागृहासाठी २५ लाख, उद्यानांसाठी दहा कोटी, नवीन रस्त्यांसाठी ९० कोटी, नवीन पुतळ्यांसाठी २० कोटी, रहादारी सुखसोयीसाठी ५० लाख, नवीन वाहन खरेदीसाठी २० कोटी, संगणकीकरणासाठी १६ कोटी ५० लाख, नवीन स्मशानभूमीसाठी ५० लाख, उड्डाणपूल, भूमिगत मार्ग, पदचारी मार्ग १० कोटी, तर समांतर रस्त्यावर लाईट उभारणीसाठी ७५ लाख रुपये ठेवण्यात आहेत.

नगरसेवकांना लेदर बॅग

महापालिकेत प्रथमच अर्थसंकल्प ठेवण्यासाठी नगसेवकांना लेदर बॅग देण्यात आली. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे नगरसेवकांनी स्वागत केले. नगरसेवक अनंत ऊर्फ बंटी जोशी यांनी आपण दहा वर्षांपासून नगरसेवक आहोत. मात्र, प्रथमच अर्थसंकल्साठी आपल्याला अशी बॅग मिळाली, असे सांगत त्यांनी सभा संपेपर्यंत ती बॅग गळ्यात ठेवली.